सांगली प्रतिनिधी : प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या मेडिकल विंगतर्फे दादी प्रकाशमणीजी यांच्या पावन स्मृतिप्रीत्यर्थ "१० कोटी व्यसनमुक्ती प्रतिज्ञा महासंकल्प अभियान" ६ ते २० ऑगस्ट २०२६ या कालावधीत देशभर राबविण्यात येणार आहे. विकसित, निरोगी आणि व्यसनमुक्त भारताच्या निर्मितीसाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग मिळविणे हा या अभियानाचा प्रमुख उद्देश असल्याची तासगाव सेवाकेंद्राच्या संचालिका ब्रह्माकुमारी डॉ. वैशाली दीदी यांनी दिली.
आजच्या धकाधकीच्या जीवनात वाढते व्यसनाधीनतेचे प्रमाण ही गंभीर सामाजिक समस्या बनली आहे. व्यसनामुळे व्यक्तीच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याबरोबरच कौटुंबिक तणाव, आर्थिक नुकसान आणि युवकांच्या भविष्यावरही नकारात्मक परिणाम होत आहेत. या पार्श्वभूमीवर समाजात व्यसनमुक्तीबाबत व्यापक जनजागृती करण्यासाठी ब्रह्माकुमारीजच्या मेडिकल विंगने हा महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेतला आहे.
या अभियानांतर्गत महाराष्ट्रातील सर्व ब्रह्माकुमारीज सेवाकेंद्रांमार्फत विविध कार्यक्रम, जनजागृती उपक्रम, व्याख्याने, प्रतिज्ञा अभियान तसेच ऑनलाइन माध्यमातून नागरिकांपर्यंत व्यसनमुक्तीचा संदेश पोहोचविण्यात येणार आहे. राज्यातील विविध सामाजिक, शैक्षणिक व औद्योगिक क्षेत्रांमध्येही अभियानाची प्रभावी अंमलबजावणी केली जाणार असल्याची माहिती डॉ. सोमनाथ वडनेरे, राज्य माध्यम समन्वयक, ब्रह्माकुमारीज मीडिया प्रभाग, माऊंट आबू यांनी दिली.
अभियानात प्रत्येक नागरिकाने ऑनलाइन किंवा व्हॉट्सअॅपद्वारे व्यसनमुक्तीची प्रतिज्ञा करावी आणि किमान ५० नागरिकांपर्यंत हा संकल्प पोहोचवावा, असे आवाहन करण्यात आले आहे. राजयोग ध्यानाचा नियमित सराव, सकारात्मक विचार, आत्मसंवाद, मूल्याधिष्ठित जीवनशैली आणि सत्संग यांच्या माध्यमातून व्यसनमुक्त जीवन जगण्याची प्रेरणा या अभियानातून दिली जाणार असल्याचे डॉ. बनारसी शहा, अध्यक्ष, ब्रह्माकुमारीज मेडिकल विंग, माऊंट आबू यांनी सांगितले.
ब्रह्माकुमारीज मेडिकल विंगने सर्व शैक्षणिक संस्था, उद्योग-व्यवसाय, स्वयंसेवी संस्था, सामाजिक संघटना, युवक मंडळे तसेच सर्वसामान्य नागरिकांना या राष्ट्रीय जनआंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. व्यसनमुक्त, निरोगी, सशक्त आणि विकसित भारताच्या निर्मितीसाठी प्रत्येकाने आपले योगदान द्यावे, असे आवाहन तासगाव सेवाकेंद्राच्या संचालिका ब्रह्माकुमारी डॉ. वैशाली दीदी यांनी केले आहे.
या अभियानाच्या माध्यमातून देशभरात १० कोटी व्यसनमुक्ती प्रतिज्ञा पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, समाजात सकारात्मक परिवर्तन घडवून व्यसनमुक्त भारताच्या दिशेने प्रभावी पाऊल उचलण्याचा ब्रह्माकुमारीजचा संकल्प असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या