गगनबावडा : तालुक्यात गेल्या ५-६ दिवसांपासून लावणीयोग्य दमदार पावसाने हजेरी लावल्याने बळीराजाची कामात मोठी धांदल उडाली आहे. विशेषतः सांगशी, सैतवडे, नरवेली, कातळी, लखमापूर, तळये आणि जांभूळनेवाडी या ‘सप्त क्रोशी’त भात लावणीच्या कामांची एकाच वेळी मोठी लगबग व गडबड पाहायला मिळत आहे.
मुसळधार पावसातही काम थांबणार नाही याची काळजी घेत बळीराजा ‘इरले’ पाठीवर घेऊन चिखलमय शेतात उतरला आहे. या परिसरात अद्यापही पारंपरिक पद्धतीने गाणी गात आणि उत्साही वातावरणात भात लावणी सुरू आहे.
या संपूर्ण भागात एकमेकांच्या शेतात सहकार्य करण्याची ‘पैरा’ पद्धत प्रामुख्याने टिकून आहे. एकमेकांच्या मदतीने भात लावणीची कामे उरकण्यावर शेतकऱ्यांचा भर असल्याने, या परस्पर सहकार्याच्या जोरावरच सप्त क्रोशीसह गगनबावडा तालुक्यात भात रोपणीच्या कामांनी आता चांगलाच वेग घेतला आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या