सांगली प्रतिनिधी : सांगली -मिरज- कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील प्रलंबित विकासकामांना गती देण्यासाठी आणि शहराच्या पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठी आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी मुख्यमंत्री ना देवेंद्रजी फडवणीस यांची मुंबई भेट घेऊन भरघोस निधीची मागणी केली आहे. या संदर्भात आमदार गाडगीळ यांनी मुख्यमंत्र्यांना सविस्तर मागणीचे निवेदन सादर केले.
सांगली शहराच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा देणाऱ्या दोन अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्पांसाठी हा निधी मागण्यात आला आहे यामध्ये विजयनगर येथील सिटी सर्व्हे क्र. १२५ मधील महानगरपालिकेच्या हक्काच्या जागेवर नागरिकांच्या सोयीसाठी अत्याधुनिक आणि सर्व सोयी-सुविधांनी सुसज्ज अशी नवीन मध्यवर्ती प्रशासकीय इमारत उभारण्याचा मानस आहे. एकाच छताखाली महानगरपालिकेचे सर्व प्रशासकीय विभाग आल्यास नागरिकांचा वेळ आणि श्रम वाचतील. सध्या महापालिकेचे मुख्य कार्यालय राजवाडा चौक येथे आहे. मात्र, तिन्ही शहरांचा वाढता विस्तार व कामकाजाचा वाढलेला व्याप पाहता विद्यमान इमारत अपुरी पडत असल्याने नवीन प्रशासकीय इमारत उभारणे अत्यंत गरजेचे बनले आहे. हे ठिकाण जिल्हाधिकारी कार्यालयाच्या शेजारी असल्याने शासकीय विभागांमध्ये सुलभ समन्वय राहील आणि नागरिकांना एकाच छताखाली जलद, पारदर्शक व कार्यक्षम सेवा मिळतील. या भव्य इमारतीच्या उभारणीसाठी १०० कोटींचा विशेष निधी मागणी तसेच राज्यातील नागरी क्षेत्रातील पिण्याच्या पाण्याच्या व स्वच्छतेच्या पायाभूत सुविधांसाठी जागतिक बँकेकडून सुमारे ५,००० कोटींचा निधी उभारण्यात येत असून यामध्ये सांगली-मिरज-कुपवाड मनपाचा समावेश आहे, या योजने मधून प्रलंबित शेरीनाला वखार भाग उच्च मल शुद्धीकरण केंद्र (STP) बांधणे व इतर अनुषंगिक कामांसाठी ९३ कोटींच्या निधीची मागणी करण्यात आली आहे. या प्रकल्पाचा परिपूर्ण प्रस्ताव नगरविकास विभागाकडे २६ सप्टेंबर २०२४ रोजी प्राप्त झालेला असून तो आज अखेर प्रलंबित असून या प्रकल्पास लवकरात लवकर प्रशासकीय मान्यता मिळून निधीची तरतूद करण्यात यावी अशी मागणी केली. हा प्रकल्प कार्यान्वित झाल्यास मनपा क्षेत्रातील स्वच्छतेचा व सांडपाण्याचा प्राथमिक व गंभीर प्रश्न कायमचा सुटणार आहे.
सांगली शहराच्या विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी आणि नागरिकांना दर्जेदार नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी हे दोन्ही प्रकल्प अत्यंत महत्त्वाचे आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगलीच्या विकासाबाबत नेहमीच सकारात्मक असून सांगली शहराच्या प्रगतीला गती देणाऱ्या या महत्त्वपूर्ण या दोन्ही प्रकल्पांसाठी राज्य सरकारकडून लवकरच भरीव निधी मंजूर होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल असे आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी सांगितले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या