पलूस प्रतिनिधी : जीवनात खरे सुख, समाधान आणि यश मिळवायचे असेल तर सर्वप्रथम व्यसनांपासून दूर राहणे आवश्यक आहे. व्यसनमुक्त जीवनाचा पाया हा चांगले संस्कार, सुसंगत विचार आणि सत्संग यातच आहे. चांगली संगतच उज्ज्वल भविष्य घडवीते, त्यामुळे "व्यसन नको, सत्संग हवा" हा विचार प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या जीवनात अंगीकारला पाहिजे, असे प्रभावी प्रतिपादन प्रतिष्ठा फाउंडेशनचे अध्यक्ष तथा प्रबोधनकार तानाजीराजे जाधव यांनी केले. यावेळी प्रतिष्ठा फौंडेशनच्या सचिव सौ. विद्या जाधव यांनीही प्रबोधनपर गाणी सादर केली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या ६७ व्या जयंतीनिमित्त जनसेवा सप्ताहाच्या निमित्ताने आशा वर्ल्ड स्कूल, कुंडल (ता. पलूस) येथे आयोजित करण्यात आलेल्या "व्यसन नको, सत्संग हवा" या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. या व्याख्यानाला विद्यार्थी, शिक्षक आणि उपस्थित मान्यवरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
आपल्या मार्गदर्शनात तानाजीराजे जाधव यांनी आजच्या तरुण पिढीसमोर उभ्या असलेल्या विविध व्यसनांच्या धोक्यांकडे लक्ष वेधले. तंबाखू, गुटखा, सिगारेट, मद्य, अमली पदार्थ यांसह मोबाईल आणि सोशल मीडियाच्या वाढत्या व्यसनामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर, मानसिकतेवर, शिक्षणावर आणि कुटुंबव्यवस्थेवर गंभीर परिणाम होत असल्याचे त्यांनी उदाहरणांसह स्पष्ट केले. व्यसनामुळे व्यक्तीचे आरोग्य, आर्थिक स्थिती आणि सामाजिक प्रतिष्ठा कशी धोक्यात येते, याची जाणीव विद्यार्थ्यांना करून दिली.
ते पुढे म्हणाले, "सत्संग म्हणजे केवळ धार्मिक कार्यक्रम नव्हे, तर चांगल्या विचारांची संगत, प्रेरणादायी व्यक्तींचा सहवास, उत्तम पुस्तके, समाजोपयोगी कार्य आणि सकारात्मक जीवनमूल्ये स्वीकारणे होय. ज्या तरुणांची संगत चांगली असते, त्यांचे भविष्य उज्ज्वल होते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी चांगले मित्र, चांगले विचार आणि चांगल्या सवयी यांची निवड केली पाहिजे."
विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच सामाजिक जाणीव ठेवून आपल्या कुटुंबात, मित्रपरिवारात आणि समाजात व्यसनमुक्तीचा संदेश पोहोचवावा, असे आवाहन त्यांनी केले. प्रत्येक विद्यार्थ्याने स्वतः व्यसनांपासून दूर राहण्याबरोबरच किमान एका व्यक्तीला व्यसनमुक्त करण्याचा संकल्प करावा, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी अजितदादा पवार यांच्या विकासाभिमुख कार्याचा गौरव करत त्यांच्या जयंतीनिमित्त समाजोपयोगी आणि विधायक उपक्रमांचे आयोजन होणे ही काळाची गरज असल्याचे नमूद केले. केवळ वाढदिवस साजरा करण्यापेक्षा समाजाला दिशा देणारे उपक्रम राबविणे हीच खरी आदरांजली असल्याचे त्यांनी सांगितले.
व्याख्यानानंतर विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत व्यसनमुक्त समाज घडविण्यासाठी स्वतःपासून सुरुवात करण्याचा निर्धार व्यक्त केला. कार्यक्रमातील मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली असून व्यसनमुक्तीचा संदेश प्रभावीपणे पोहोचल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजितदादा गट) पलूस तालुक्याचे अध्यक्ष डॉ. सारंग माने यांची प्रमुख उपस्थिती लाभली. प्राचार्य एस ए पाटील, व्यवस्थापक निखिल पाटील यांच्यासह आशा वर्ल्ड स्कूलचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन आशा वर्ल्ड स्कूल, कुंडल यांच्या वतीने करण्यात आले. उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून कार्यक्रमाची सांगता आभार प्रदर्शनाने करण्यात आली.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या