तासगाव:दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर झालेल्या कथित पोलिस लाठीहल्ल्याचे पडसाद आता राज्यभर उमटू लागले असून,त्याच पार्श्वभूमीवर तासगावात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने रविवार, दि.२६ जुलै रोजी सकाळी १०.३० वाजता तासगाव बसस्थानक चौकात धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिस कारवाईचा तीव्र निषेध करत दोषी पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी तसेच केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा,अशी मागणी आंदोलनातून करण्यात येणार आहे.या आंदोलनाच्या अनुषंगाने मनसेचे सांगली जिल्हा संघटक अमोल काळे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपतालुकाप्रमुख पुरण मलमे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक विशाल टकले यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की,नीट परीक्षा, पेपरफुटी आणि शैक्षणिक व्यवस्थेतील गोंधळामुळे लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे.या प्रश्नांवर न्याय मिळावा,या मागणीसाठी दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थी संघटना व सामाजिक कार्यकर्त्यांनी आंदोलन केले होते. मात्र आंदोलन दडपण्यासाठी पोलिसांनी लाठीमार, अश्रुधुराचा वापर आणि पाण्याचे फवारे मारल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना आंदोलन स्थळावरून जबरदस्तीने हटवून रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचा उल्लेखही निवेदनात करण्यात आला आहे. त्यानंतर अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वाखाली संसदेकडे निघालेल्या मोर्चाला पोलिसांनी अडविल्यानंतर परिस्थिती चिघळली आणि विद्यार्थ्यांवर मारहाण झाल्याचा दावा आंदोलनकर्त्यांनी केला आहे.मनसे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सरकारवर टीका करत लोकशाहीत शांततापूर्ण आंदोलन करणे हा प्रत्येक नागरिकाचा घटनात्मक अधिकार असून, विद्यार्थ्यांचा आवाज दडपण्यासाठी पोलिसी बळाचा वापर करणे ही लोकशाहीसाठी धोकादायक बाब आहे, असे म्हटले आहे. सरकारने दडपशाहीचे धोरण स्वीकारण्याऐवजी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर ठोस भूमिका घेऊन न्याय द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रश्नांवर प्रभावी निर्णय आणि केंद्रीय शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा या प्रमुख मागण्यांसाठी आयोजित धरणे आंदोलनात विद्यार्थी, पालक, युवक आणि सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन अमोल काळे आणि पुरण मलमे यांनी केले आहे.
यावेळी बाहुबली पाटील, जॉन जमादार, दीपक पाटील, स्वप्निल शेंडगे, अतुल खराडे, प्रमोद सावंत, रोहित कोरडे, उमेश कुकडे, दिलीप कोळीगुडे, शहाजी जाधव, राहुल बुधावले, गणेश पाथरवट, विजय आवळे, ओंकार बुरले यांच्यासह मनसेचे पदाधिकारी, शिवसैनिक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या