तासगाव : तासगाव तालुक्यातील मणेराजुरी येथे सराफ दुकान फोडून चांदीचे दागिने चोरी करणाऱ्या आरोपीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा (एलसीबी) सांगलीच्या पथकाने अवघ्या चार दिवसांत अटक केली. आरोपीकडून चोरीस गेलेले सुमारे २ किलो ७३४ ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने तसेच गुन्ह्यात वापरलेली दुचाकी आणि मोटारसायकलची सायलेन्सर बुश मिळून एकूण ६ लाख ९२ हजार ८० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ९ जुलै २०२६ रोजी मणेराजुरी गावातील फिर्यादी यांच्या महालक्ष्मी ज्वेलर्स या दुकानाचे अज्ञात चोरट्यांनी दुकानाचा दरवाजा तोडून आत प्रवेश करत चांदीचे दागिने चोरून नेले होते. याप्रकरणी तासगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संग्राम धायगुडे यांनी विशेष पथक तयार करून आरोपीचा शोध सुरू केला. तपासादरम्यान पोलीस कर्मचारी सागर टिंगरे, दरीबा बंडगर आणि सुनील जाधव यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, चोरी करणारा संशयित युवक मणेराजुरी परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून संशयिताला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने आपले नाव राहुल दादासो जमदाडे (वय २९), रा. समर्थनगर शाळेजवळ, मणेराजुरी, ता. तासगाव असे सांगितले. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या आरोपीने पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर महालक्ष्मी ज्वेलर्समधील चोरीची कबुली दिली.
आरोपीच्या ताब्यातून पैंजण, कडदोरे, ब्रेसलेट, हल्ला, गणपतीची मूर्ती, बिछव्या, अंगठ्या, चेन, दंडकडी, जोडवी, चांदीची मुखवटे, नथी, मेटल, नाक टोच, कडी आदी मिळून २ किलो ७३४ ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने, गुन्ह्यात वापरलेली हिरो कंपनीची स्प्लेंडर प्लस मोटारसायकल तसेच एक मोटारसायकल सायलेन्सर बुश असा एकूण ६,९२,०८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बाळकुंदर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संग्राम धायगुडे, पोलीस कर्मचारी सागर टिंगरे, दरिया बंडगर, अतुल माने, सतीश माने, अनिल कोळेकर, नरेश खरात, सागर लवटे, प्रकाश पाटील, मोहनराव शिंदे, संदीप वाळुंज, अमर राठोड, सुनील जाधव, विकास खोत, महेश कुंभार, गणेश शिंदे, सुशांत चिले, विजय पाटणकर आदींच्या पथकाने केली.
सदर आरोपीला अटक करून पुढील तपास तासगाव पोलीस ठाणे करीत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या