प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:एकेकाळी प्रलंबित कामे, विलंब आणि नागरिकांच्या तक्रारींमुळे चर्चेत राहिलेले तासगाव भूमी अभिलेख कार्यालय आता कार्यक्षमतेच्या जोरावर चर्चेचा विषय ठरत आहे.प्रलंबित प्रकरणांचा झपाट्याने निपटारा,मोजणी प्रकरणांना दिलेली अभूतपूर्व गती, फेरफार नोंदींचे विक्रमी प्रमाणात निकालीकरण आणि नागरिकाभिमुख कामकाजामुळे कार्यालयाने अल्पावधीतच आपल्या कार्यपद्धतीत लक्षणीय बदल घडवून आणला आहे.१ जानेवारी २०२६ ते ३० जून २०२६ या अवघ्या सहा महिन्यांच्या कालावधीत कार्यालयाने तब्बल ८७७ मोजणी प्रकरणांचा निपटारा करून विक्रमी कामगिरी केली आहे.या मोहिमेमुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली प्रकरणेही मार्गी लागली असून,एक वर्षापेक्षा जुने एकही मोजणी प्रकरण आता शिल्लक राहिलेले नाही,ही बाब विशेष उल्लेखनीय ठरली आहे.सहा महिन्यांपेक्षा अधिक कालावधीची केवळ २१ प्रकरणे प्रलंबित असल्याचे समजते ती ही लवकरच निकाली निघतील.विशेष म्हणजे,केवळ नऊ मोजणी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून ही उल्लेखनीय कामगिरी साध्य करण्यात आली आहे.मर्यादित मनुष्यबळ असूनही नियोजनबद्ध कामकाज आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे कार्यालयाने हा टप्पा गाठल्याचे बोलले जात आहे.मोजणीबरोबरच मालमत्ता पत्रकावरील फेरफार नोंदींच्या कामालाही मोठी गती देण्यात आली आहे.जानेवारी ते जून या कालावधीत ७१० फेरफार प्रकरणे निकाली काढण्यात आली.तसेच नावातील चुका, नोंदीतील त्रुटी आणि इतर १५५ चूकदुरुस्तीची प्रकरणे तातडीने निकाली काढून संबंधित नागरिकांना मोठा दिलासा देण्यात आला.भूमी अभिलेख कार्यालयामार्फत सीटी सर्व्हे गावांतील वारसा नोंदी, बोजा नोंदी, फाळणी, जमीन व प्लॉट मोजणी, हद्द निश्चिती, सनद वितरण तसेच विविध महसुली कामांचा नियमित आणि वेळेत निपटारा केला जात आहे.प्रत्येक अर्जाची नियमांनुसार काटेकोर पडताळणी करूनच पुढील कार्यवाही केली जात असल्याने प्रलंबित फाईलींचा ढीग झपाट्याने कमी होत आहे.कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना आवश्यक कागदपत्रांची स्पष्ट माहिती देणे,अर्जातील त्रुटी तत्काळ निदर्शनास आणून देणे आणि शक्य तितक्या कमी वेळेत काम पूर्ण करण्यावर विशेष भर दिला जात आहे.परिणामी नागरिकांच्या कार्यालयातील वारंवार होणाऱ्या फेऱ्यांमध्ये मोठी घट झाली असून, कामकाजाविषयी समाधान व्यक्त केले जात आहे.या उल्लेखनीय कामगिरीमागे उपअधीक्षक भूमी अभिलेख विजयकुमार शेंडगे आणि शिरस्तेदार अमोल खरमाटे यांचे प्रभावी नेतृत्व, प्रलंबित प्रकरणांचा सातत्याने घेतलेला आढावा,नियोजनबद्ध कार्यपद्धती आणि कर्मचाऱ्यांकडून करून घेतलेले परिणामकारक काम हे महत्त्वाचे घटक मानले जात आहेत.तसेच दोन्ही अधिकारी तालुक्यातील असल्याने स्थानिक प्रश्नांची जाण ठेवून त्यांनी कामाला दिलेली गतीही यशाचे कारण ठरत असल्याची चर्चा आहे.
वरिष्ठ स्तरावरूनही कामकाजाचा सातत्याने आढावा घेतला जात असून,प्रलंबित प्रकरणे शून्यावर आणण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून कार्यालयाची वाटचाल सुरू आहे.पारदर्शक,गतिमान आणि नागरिकाभिमुख प्रशासनाचा आदर्श निर्माण करण्याच्या दिशेने तासगाव भूमी अभिलेख कार्यालयाने टाकलेले हे पाऊल निश्चितच उल्लेखनीय मानले जात आहे.त्यामुळे एकेकाळी तक्रारींसाठी ओळखले जाणारे हे कार्यालय आज वेगवान आणि परिणामकारक कामकाजासाठी नवी ओळख निर्माण करण्यात यशस्वी ठरत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या