सांगली प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाचे संस्थापक आमदार संजय केळकर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग, सांगली शाखा आणि पश्चिम महाराष्ट्र शाखेच्या वतीने समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आला.
आमदार केळकर यांनी वाढदिवसानिमित्त कार्यकर्ते, हितचिंतक व नागरिकांना बॅनरबाजी, पुष्पगुच्छ किंवा सत्कार टाळण्याचे आवाहन केले होते. त्याऐवजी गरजू व्यक्तींना मदत करावी, विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहाय्य द्यावे, रुग्णांना औषधांची मदत करावी, वृक्षारोपण करावे किंवा अन्य कोणतेही समाजहिताचे सत्कर्म करावे, असे त्यांनी आवर्जून सांगितले होते.
त्यांच्या या संदेशाचे तंतोतंत पालन करत सांगली येथील हौसाई वृद्धाश्रमात पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर वृद्धांसाठी कफ सिरपचे वाटप करण्यात आले.
हा उपक्रम सांगली जिल्हाध्यक्ष तथा पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शशिकांत राजाराम पाटील यांच्या हस्ते पार पडला.
यावेळी प्राथमिक शिक्षकांसाठी मोलाचे योगदान देणारे दिवंगत आमदार शिवाजीराव पाटील यांचे नातू धैर्यशील उर्फ शंभूराजे पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
हौसाई वृद्धाश्रम व्यवस्थापनाच्या वतीने यावेळी आभार पत्र देण्यात आले यावेळी ज्येष्ठ शिक्षक नेते बाळासाहेब गायकवाड उपस्थित होते.
वाढदिवसाचे औचित्य साधून समाजसेवेचा संदेश देणारा हा उपक्रम उपस्थितांकडून कौतुकास्पद ठरला. शिक्षक परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनीही भविष्यात अशा समाजोपयोगी उपक्रमांना सातत्याने प्राधान्य देण्याचा निर्धार व्यक्त केला.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या