मुंबई : मिरज, जत, कवठेमहांकाळ, तासगाव (पूर्व), आटपाडी आणि खानापूर तालुक्यातील अनेक भागांमध्ये अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने शेतकऱ्यांसमोर सिंचनाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर आमदार डॉ. सुरेशभाऊ खाडे यांनी मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस आणि जलसंपदा मंत्री मा. राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन दुष्काळी भागातील शेतकऱ्यांच्या वतीने टेंभू, म्हैसाळ आणि ताकारी उपसा सिंचन योजना तातडीने सुरू करण्याची मागणी केली. यावेळी आमदार गोपीचंद पडळकर उपस्थित होते.
शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांनी तातडीने सकारात्मक निर्णय घेत, सुमारे ₹१० कोटींचे थकीत वीजबिल महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या स्वनिधीतून भरून संबंधित सिंचन योजना सुरू करण्याचे आदेश दिले. जलसंपदा मंत्री मा. राधाकृष्ण विखे पाटील यांनीही या निर्णयासाठी आवश्यक सहकार्य केले.
या निर्णयामुळे दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून पिकांना आवश्यक पाणी उपलब्ध होण्यास मदत होईल. राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देत घेतलेला हा निर्णय शेती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.
याबद्दल मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस आणि जलसंपदा मंत्री मा. राधाकृष्ण विखे पाटील यांचे आमदार डॉ. सुरेशभाऊ खाडे यांनी शेतकऱ्यांच्या वतीने मनःपूर्वक आभार मानले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या