प्रतिष्ठा न्यूज / योगेश रोकडे
मिरज : माजी कॅबिनेट मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार डॉ. सुरेश (भाऊ) खाडे यांच्या वाढदिवसानिमित्त MTDK शैक्षणिक संकुलातर्फे आयोजित करण्यात आलेली ‘MTDK RUN 2026’ ही आरोग्य जनजागृती धाव उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. ‘HEALTHY मिरज, FIT मिरजकर’ या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला सांगली, मिरज आणि परिसरातील हजारो नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
यंदाच्या धाव स्पर्धेची ‘वारकरी संप्रदाय – भक्ती, शक्ती आणि आरोग्याची धाव’ ही संकल्पना विशेष आकर्षण ठरली. वारकरी संप्रदायातील शिस्त, समर्पण, एकोपा आणि सकारात्मक जीवनमूल्यांचा संदेश या उपक्रमाच्या माध्यमातून समाजापर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यात आला.
महिला सक्षमीकरणाला प्राधान्य देत यंदाच्या धावेत महिलांच्या सहभागासाठी विशेष नियोजन करण्यात आले होते. MTDK शैक्षणिक संकुलाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) सौ. स्वातीताई सुशांत खाडे यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. आरोग्य, आत्मविश्वास आणि स्वावलंबनाचा संदेश देत महिलांचा सहभाग कार्यक्रमाचे प्रमुख वैशिष्ट्य ठरला.
या उपक्रमाच्या निमित्ताने सनाथ वेल्फेअर संस्था, पुणे यांच्या वतीने आयोजित चौथ्या अनाथ माहेरवाशीण मेळाव्यातील महिलांनीही सहभाग घेत आरोग्य जनजागृतीसाठी बाईक रॅली काढली. श्रद्धा, संस्कृती आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देणाऱ्या या रॅलीने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
धाव पूर्ण झाल्यानंतर विविध सामाजिक संस्था, ग्रुप तसेच सहभागी स्पर्धकांचा आभारपत्र व सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमादरम्यान उत्साहपूर्ण वातावरणात आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश देण्यात आला.
गेल्या चार वर्षांपासून आमदार डॉ. सुरेशभाऊ खाडे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या या उपक्रमाने मिरज परिसरात आरोग्यविषयक जागरूकता निर्माण करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. दरवर्षी वाढणारा सहभाग हा उपक्रमाच्या लोकप्रियतेचा आणि समाजातील स्वीकाराचा पुरावा असल्याचे आयोजकांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आमदार डॉ. सुरेश (भाऊ) खाडे, MTDK शैक्षणिक संकुलाच्या संचालिका सौ. सुमनताई खाडे, श्री. सुशांत खाडे, मुख्याध्यापिका सौ. संगीता पाटील, सौ. करुणा माने, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, स्वयंसेवक तसेच पोलीस प्रशासन यांनी विशेष परिश्रम घेतले.
भक्ती, शक्ती आणि आरोग्याचा संगम घडविणारी ‘MTDK RUN 2026’ मिरजकरांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे अविस्मरणीय ठरल्याची भावना सहभागी नागरिकांनी व्यक्त केली.
यावेळी भाजपा अल्पसंख्याक प्रदेश सचिव फारुकभाई जमादार, माजी नगरसेवक योगेंद्र दादा थोरात आदि मान्यवर उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या