प्रतिष्ठा न्यूज / योगेश रोकडे
सांगली : विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे ज्ञान मिळावे तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि मशीन लर्निंग (ML) यांसारख्या भविष्योन्मुख क्षेत्रांची ओळख व्हावी या उद्देशाने विश्रामबाग येथील स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठानमध्ये अत्याधुनिक कॉम्प्युटर व एआय-एमएल लॅब उभारण्यात आली आहे. या लॅबचे उद्घाटन उद्योजक श्री योगेश लोहकरे आणि उद्योजक श्री गिरीश चितळे यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.
यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री विजय नामजोशी, कार्यवाहक श्री सुनील देशपांडे, श्री सचिन कानेटकर, संचालक मंडळाचे सदस्य, तसेच १९९६ च्या दहावीच्या बॅचचे प्रतिनिधी श्री प्रशांत वाटवे, श्री यशोधन कुलकर्णी आणि श्री भालचंद्र कुलकर्णी उपस्थित होते. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीही मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित होते.
या आधुनिक लॅबच्या उभारणीसाठी संस्थेच्या १९९६ च्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांनी आर्थिक योगदान देत सामाजिक बांधिलकीचे प्रेरणादायी उदाहरण घालून दिले. आपल्या शाळेप्रती असलेली आत्मीयता आणि भावी पिढीला आधुनिक शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून देण्याची तळमळ यामुळे हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प साकार झाला असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
नवीन लॅबमुळे विद्यार्थ्यांना संगणक शिक्षणासोबतच एआय आणि मशीन लर्निंगसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे प्रत्यक्ष प्रशिक्षण घेण्याची संधी मिळणार आहे. यामुळे त्यांच्या ज्ञानात भर पडून भविष्यातील करिअरच्या विविध संधींचे नवे दालन खुले होणार आहे.
उद्घाटन प्रसंगी मान्यवरांनी विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाचा सकारात्मक वापर करून नवकल्पनांना चालना द्यावी आणि देशाच्या प्रगतीत मोलाचे योगदान द्यावे, असे आवाहन केले. कार्यक्रमात उपस्थितांनी १९९६ च्या माजी विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे विशेष कौतुक करत त्यांचे अभिनंदन केले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या