रस्त्यालगतच्या विहिरींना संरक्षण कटडे बांधावेत; मुख्यमंत्री यांना सतीश साखळकर यांचे निवेदन
By -
जून १५, २०२६
0
प्रतिष्ठा न्यूज
सांगली, प्रतिनिधी : राज्यातील तसेच सांगली जिल्ह्यातील जिल्हा मार्ग, राज्य मार्ग आणि राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या धोकादायक विहिरींना संरक्षण कटडे बांधून नागरिकांच्या सुरक्षेसाठी तात्काळ उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिक जागृती मंच, सांगली जिल्ह्याचे अध्यक्ष सतीश साखळकर यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, अलीकडे पंढरपूर परिसरात रस्त्यालगत असलेल्या विहिरीमध्ये वाहन कोसळून झालेल्या दुर्दैवी अपघातात निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. या घटनेमुळे राज्यातील रस्ते सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून भविष्यात अशा दुर्घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी शासनाने तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे गरजेचे आहे.
महाराष्ट्रातील अनेक जिल्हा मार्ग, राज्य मार्ग आणि राष्ट्रीय महामार्गांच्या कडेला जुन्या व उघड्या विहिरी, बोअरवेल, पाण्याचे खड्डे आणि इतर धोकादायक ठिकाणे मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. अनेक ठिकाणी या विहिरींना कोणत्याही प्रकारचे संरक्षण कटडे, सुरक्षा भिंती, चेतावणी फलक किंवा परावर्तक बसविण्यात आलेले नाहीत. विशेषतः रात्रीच्या वेळी, पावसाळ्यात अथवा कमी दृश्यमानतेच्या परिस्थितीत वाहनचालकांना अशा ठिकाणांचा अंदाज येत नसल्याने गंभीर अपघात होण्याचा धोका वाढत आहे.
सांगली जिल्ह्यातही विविध रस्त्यांच्या लगत अशा अनेक धोकादायक विहिरी असून नागरिक, शेतकरी, दुचाकीस्वार, वाहनचालक तसेच पादचारी यांच्या जीवितास सतत धोका निर्माण होत असल्याचे साखळकर यांनी निवेदनात नमूद केले आहे.
यासंदर्भात राज्यातील सर्व जिल्हा मार्ग, राज्य मार्ग व राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या विहिरींचे तातडीने सर्वेक्षण करावे, धोकादायक विहिरी, बोअरवेल व खड्ड्यांभोवती मजबूत सुरक्षा कटडे उभारावेत, संबंधित ठिकाणी परावर्तक, चेतावणी फलक व सौरऊर्जेवरील सुरक्षा दिव्यांची व्यवस्था करावी, सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून संयुक्त मोहीम राबवावी, तसेच प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना अशा धोकादायक ठिकाणांची यादी तयार करून निश्चित कालमर्यादेत कामे पूर्ण करण्याचे निर्देश द्यावेत, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.
तसेच भविष्यात नवीन रस्त्यांची उभारणी करताना रस्त्यालगतच्या विहिरींना संरक्षण कटडे बांधणे बंधनकारक करण्याची मागणीही साखळकर यांनी केली आहे. नागरिकांच्या जीविताचे संरक्षण करणे ही शासनाची प्राथमिक जबाबदारी असल्याने पंढरपूर येथील दुर्दैवी घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी शासनाने तातडीने ठोस निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या