प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : भारतीय हवामान विभागाने यंदा एल-निनोच्या प्रभावामुळे पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता वर्तविली असून जून महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात तासगाव तालुक्यात अत्यल्प पर्जन्यमानाची नोंद झाली आहे.परिणामी तालुक्यातील अनेक तलावांतील पाणीसाठा झपाट्याने घटत असून काही जलस्रोत धोक्याच्या पातळीवर पोहोचले आहेत. या पार्श्वभूमीवर उपलब्ध पाणी साठा पिण्याच्या वापरासाठी राखीव ठेवण्यात आला असून नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा,असे आवाहन तहसीलदार अतुल पाटोळे यांनी केले आहे.तालुक्यात भविष्यात निर्माण होऊ शकणाऱ्या पाणीटंचाईच्या संकटाचा विचार करून प्रशासनाने आतापासूनच उपाययोजना सुरू केल्या आहेत.शासनाच्या निर्देशानुसार पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले असून धरणे, तलाव,कालवे आणि इतर जलस्रोतांमधील उपलब्ध पाण्याचे नियोजन करण्यात येत आहे.तहसीलदार पाटोळे यांनी सांगितले की, कोणत्याही परिस्थितीत तलावातील किंवा इतर जलस्रोतांतील पाण्याचा सिंचनासाठी उपसा करू नये.शेतकऱ्यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनाला सहकार्य करावे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होऊ नये, यासाठी प्रत्येक थेंब जपून वापरण्याची गरज आहे.दरम्यान, धरणे, तलाव, कालवे आणि अन्य जलस्रोतांमधून होणारा अनधिकृत पाणी उपसा रोखण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.महसूल,पाटबंधारे आणि संबंधित विभागांच्या संयुक्त पथकांमार्फत नियमित तपासणी करण्यात येणार असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर प्रशासकीय व कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.पाणी ही सर्वांची सामूहिक संपत्ती असून सध्याच्या परिस्थितीत तिचे संवर्धन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. भविष्यातील संभाव्य पाणीटंचाई टाळण्यासाठी नागरिकांनी पाणी वाचविण्याच्या उपाययोजना अंगीकाराव्यात, गळती रोखावी, पाण्याचा अपव्यय टाळावा आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदार अतुल पाटोळे यांनी केले आहे.
चौकट : 👉 तलावांतील पाणी पिण्यासाठी राखीव
👉 सिंचनासाठी पाणी उपसा टाळण्याचे आदेश
👉 अनधिकृत पाणी उपशाविरोधात विशेष मोहीम
👉 नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा
👉 नागरिकांनी पाणी काटकसरीने वापरण्याचे आवाहन
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या