तासगाव : तालुक्यातील पुनदी येथे स्थानिक जिल्हा परिषद मराठी मुला-मुलींच्या शाळेत शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या पहिल्या दिवसाचे स्वागत अत्यंत जल्लोषात आणि उत्साही वातावरणात करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित असणाऱ्या सर्व उपस्थितांचे आणि पालकांचे शब्दसुमनांनी स्वागत आदरणीय जाधव सर यांनी केले. याप्रसंगी उपस्थित प्रमुख पाहुण्यांचे गुलाबपुष्प देऊन अत्यंत उत्साहात स्वागत करण्यात आले. पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचेही गुलाबपुष्प, शालेय पाठ्यपुस्तके आणि गणवेश देऊन स्वागत करण्यात आल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता.
*✨सजविलेल्या ट्रॅक्टरमधून भव्य प्रभात फेरी✨*
शाळेच्या पहिल्या दिवशी गावातून ढोल-ताशांच्या गजरात आणि सजवलेल्या ट्रॅक्टरमधून विद्यार्थ्यांची भव्य प्रभात फेरी काढण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी 'चला शाळेला चला', 'आपली शाळा जिल्हा परिषद शाळा', 'शाळा सुरू झाली, चला शाळेला जाऊया' अशा घोषणा देत संपूर्ण गाव परिसर दणाणून सोडला.
या प्रभात फेरीसाठी बाळू दत्तू गेळगे यांनी ट्रॅक्टर सेवा, शरद युवराज पाटील यांनी ट्रॉली सेवा तर सुशांत मोहन देशमुख यांनी मिरवणुकी दरम्यान ट्रॅक्टर-ट्रॉलीची आकर्षक सजावट करून दिली. तसेच फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीसाठी 'रील स्टार' सुरज कुंभार यांचे मोठे योगदान लाभले.
*✨संगीतमय वातावरण, औक्षण आणि सेल्फी पॉइंट✨*
शाळेच्या पहिल्या दिवशी संपूर्ण शाळेत अतिशय आनंददायी आणि संगीतमय वातावरण निर्माण करण्यात आले होते. शाळेत येणाऱ्या सर्व लाडक्या विद्यार्थ्यांचे शिक्षिका व माता पालकांकडून अत्यंत प्रेमाने औक्षण करण्यात आले. पहिल्या दिवसाची ही गोड आठवण जतन करण्यासाठी शाळेत एक सुंदर 'सेल्फी पॉइंट' तयार करण्यात आला होता. या सेल्फी पॉइंटवर विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी उत्साहाने फोटो काढून घेतले. विद्यार्थ्यांचे शाळेत मन रमावे आणि त्यांच्या मनातील भीती दूर व्हावी, यासाठी शाळेच्या पहिल्या दिवशी विविध खेळ आणि मनोरंजनाचे खेळ घेण्यात आले. यामुळे विद्यार्थ्यांचा पहिला दिवस अतिशय आनंदाने व उत्साहात साजरा झाला.
*✨मान्यवरांचे मार्गदर्शन व आवाहन✨*
*सौ. शुभांगीताई पाटील (पहिल्या लोकनियुक्त सरपंच):*
सर्व विद्यार्थ्यांनी न चुकता दररोज शाळेत यावे आणि पालकांनी विद्यार्थ्यांची शाळा चुकू देऊ नये. विद्यार्थी शाळेत नियमित उपस्थित राहिले तर त्यांची प्रगती नक्कीच होईल, शिक्षक वृंदांनी विद्यार्थ्यांच्या विकास व प्रगतीसाठी अधिक प्रयत्न करावेत. अशी आशा व्यक्त करत त्यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
*आदरणीय कोळी साहेब (विस्तार अधिकारी, तासगाव):*
पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांची लाभलेली भरघोस उपस्थिती, शाळेतील उत्तम सोयी-सुविधा आणि विद्यार्थ्यांचा उत्साह या सर्व गोष्टींबाबत त्यांनी विशेष समाधान व्यक्त केले. प्रसंगी त्यांनी आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा देत आम्ही लाल असताना शाळेत जाण्यासाठी मनात भीती असायची विद्यार्थी शाळेत जात नव्हते. आज परिस्थिती खूप बदलली आहे विद्यार्थी स्वतःहून शाळेत येत आहेत. ज्याचं मला कौतुक वाटतं असे म्हणत त्यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
*श्री. प्रवीण सूर्यवंशी (पोलीस पाटील, पुनदी):*
त्यांनी विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि शाळेच्या प्रगतीबाबत मार्गदर्शन केले. "विद्यार्थी-पालक, विद्यार्थी-शिक्षक, आणि पालक-शिक्षक-व्यवस्थापन समिती यांच्यात योग्य समन्वय असावा," असे मत त्यांनी मांडले. तसेच शाळेच्या सुरक्षितेसाठी तसेच प्राथमिक अडचणी सोडवण्यासाठी मी नेहमी तत्पर असून, शिक्षक, विद्यार्थी व पालकांनी अडचणी आमच्यापर्यंत पोहोचवाव्यात, असे सांगत शुभेच्छा दिल्या.
*सौ. ठोंबरे मॅडम (मुख्याध्यापिका):*
मुख्याध्यापिका मॅडमांनी शाळेच्या विद्यार्थ्यांच्या आणि शाळेच्या आतापर्यंतच्या प्रगतीचा व गुणवत्तेचा सविस्तर आलेख उपस्थितांसमोर मांडला आणि विद्यार्थ्यांचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या.
*आदरणीय माळी सर:* त्यांनी पालक व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना, "विद्यार्थ्यांकडून आम्हाला काय अपेक्षित आहे आणि शाळा म्हणून आम्ही विद्यार्थ्यांना काय देणार आहोत," याबद्दल सविस्तर भूमिका स्पष्ट केली.
*✨उत्कृष्ट नियोजन आणि आभार✨*
या संपूर्ण स्नेहमय आणि ऐतिहासिक सोहळ्याचे नेटके नियोजन आदरणीय माने मॅडम, पाटील मॅडम व देवकते मॅडम यांनी केले होते. पहिल्या दिवशी सर्व विद्यार्थ्यांना गोड खाऊ वाटून तोंड गोड करण्यात आले.
शेवटी आदरणीय माळी मॅडम यांनी उपस्थित सर्व मान्यवर, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, माता पालक संघ, ग्रामस्थ आणि पालकांचे मनःपूर्वक आभार मानले व त्यांच्या आभारप्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.
✨✨✨✨✨✨✨✨
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या