प्रतिष्ठा न्यूज
पलूस/कडेगाव प्रतिनिधी : प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाविरोधातील आंदोलनाला ग्रामीण भागातून मोठा पाठिंबा मिळत असून, विटा येथील एका शेतकरी महिलेने शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीचे निमंत्रक ॲड दीपक लाड यांना भावनिक पत्र लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. या पत्रामध्ये शेतकऱ्यांच्या जमिनी वाचविण्यासाठी सुरू असलेल्या लढ्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली आहे.
आशा सूर्यकांत जगताप या शेतकरी महिलेने लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गामुळे अनेक शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी बाधित होणार असून त्यामुळे शेतकरी वर्गात मोठी चिंता निर्माण झाली आहे. आपल्या कुटुंबाच्या उपजीविकेचा आधार असलेल्या जमिनी वाचविण्यासाठी सर्व शेतकरी या महामार्गाला विरोध करत आहेत.
पत्रात त्यांनी नमूद केले आहे की, १५ जून २०२६ रोजी कामेरी (ता. वाळवा) येथे आयोजित आंदोलनाच्या नियोजन बैठकीत सहभागी होण्याची संधी मिळाली. या बैठकीत विविध गावांतील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. याच बैठकीत त्यांचा प्रथमच अॅड. दीपक लाड यांच्याशी परिचय झाला.
शेतकरी महिलेने आपल्या पत्रात ॲड दीपक लाड यांच्या कार्याचे कौतुक करताना म्हटले आहे की, आज शक्तीपीठ बाधित शेतकऱ्यांसाठी ते आशेचा किरण बनले आहेत. शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी, जमिनी वाचविण्यासाठी आणि अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी ते सातत्याने कार्यरत आहेत. त्यांची सामाजिक बांधिलकी, निस्वार्थ सेवा आणि शेतकऱ्यांप्रती असलेली तळमळ प्रेरणादायी असल्याचेही त्यांनी नमूद केले.
सध्याच्या परिस्थितीत अनेक शेतकरी कुटुंबांवर संकटाचे ढग दाटून आले असताना ॲड लाड यांनी आंदोलनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत त्यांना आधार दिल्याची भावना पत्रातून व्यक्त करण्यात आली आहे. विशेषतः शेतकरी महिलांना आणि कुटुंबांना या लढ्यामुळे मोठा मानसिक आधार मिळाल्याचेही त्यांनी सांगितले.
पत्राच्या शेवटी त्यांनी शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी सुरू असलेल्या या संघर्षात आपण कायम सोबत राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. “आमच्या जमिनी, आमचे अस्तित्व आणि पुढील पिढ्यांचे भविष्य वाचविण्यासाठी हा लढा अत्यंत महत्त्वाचा आहे,” असे नमूद करत त्यांनी ॲड दीपक लाड यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.
या पत्रामुळे शक्तीपीठ महामार्गाविरोधातील आंदोलनाला ग्रामीण भागातील महिला शेतकऱ्यांचाही सक्रिय पाठिंबा असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. आंदोलनातील नेतृत्वाविषयीचा विश्वास आणि जमिनी वाचविण्याची तीव्र भावना या पत्रातून प्रकर्षाने दिसून येत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या