प्रतिष्ठा न्यूज/ योगेश रोकडे
मिरज : विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे शिक्षण देण्याच्या उद्देशाने मातोश्री तानुबाई दगडू खाडे (MTDK) इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, मिरज येथे अत्याधुनिक ‘रोबोटिक लॅब’चे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी तथा भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा स्वातीताई सुशांत खाडे व संचालिका रसिकाताई सुजित खाडे यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. ‘Robostorms’च्या सहकार्याने साकारलेल्या या लॅबमुळे विद्यार्थ्यांना रोबोटिक्स, कोडिंग आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) क्षेत्रातील प्रत्यक्ष प्रशिक्षणाची संधी उपलब्ध होणार आहे.
उद्घाटन प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाचा सकारात्मक वापर करून नावीन्यपूर्ण संशोधन आणि कौशल्य विकासाकडे वाटचाल करावी, असे आवाहन केले. शाळेने “Inspiring Minds, Building Futures” या संकल्पनेतून सुरू केलेली ही लॅब विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाला नवी दिशा देणार असल्याचे सांगण्यात आले.
या लॅबमध्ये विद्यार्थ्यांना रोबोट तयार करणे, कोडिंग, मोटर्स व गिअर मेकॅनिझम समजून घेणे, लॉजिक बिल्डिंग आणि विविध रोबोटिक्स किट्सच्या साहाय्याने प्रत्यक्ष प्रयोग करण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे पुस्तकी ज्ञानासोबतच अनुभवाधारित शिक्षणाला चालना मिळेल.
शाळेच्या मुख्याध्यापिका संगीता पाटील यांनी यावेळी सांगितले की, “आजच्या विद्यार्थ्यांना भविष्यातील तंत्रज्ञानाशी जोडणे ही काळाची गरज आहे. ही रोबोटिक लॅब त्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांसाठी सक्षम बनवेल.”
उद्घाटन सोहळ्यास शिक्षक, पालक, शिक्षणप्रेमी आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उपक्रमाचे स्वागत केले. या लॅबसाठी माजी कॅबिनेट मंत्री तथा पालकमंत्री सांगली जिल्हा आ. डॉ. सुरेश भाऊ खाडे संचालिका सुमनताई खाडे, सुशांत खाडे, रसिकाताई खाडे, सुजित खाडे यांचे विशेष सहकार्य लाभले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या