कुपवाड : श्रीमती सोनाबाई अण्णासो पाटील कन्या शाळा, कुपवाड येथे शैक्षणिक वर्ष 2026-27 च्या प्रारंभानिमित्त प्रवेशोत्सव तसेच आयुष सेवाभावी संस्थेमार्फत विद्यार्थिनींना वही वाटप कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून एमटीडीके स्कूलच्या मुख्य कार्यकारी अधिकारी स्वातीताई सुशांत खाडे, संचालिका रसिकाताई खाडे, शरद सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अजय यड्रावकर, कुपवाडचे पोलीस निरीक्षक आनंदराव घाडगे, जिल्हा परिषद सदस्या सानिका यड्रावकर, आयुष सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष अमोल पाटील यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. तसेच शाळा समितीचे अध्यक्ष राजगोंडा पाटील व इतर सदस्य, तसेच आयुष सेवाभावी संस्थेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी शाळेच्या मुख्याध्यापिका तथा यशवंत शिक्षण संस्थेच्या संचालिका एस. पी. पाटील यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून प्रास्ताविक केले. यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विद्यालयातील सर्व विद्यार्थिनींना वह्यांचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी पोलीस निरीक्षक आनंदराव घाडगे, स्वाती खाडे आणि अजय यड्रावकर यांनी विद्यार्थिनींना शिक्षणाचे महत्त्व, शिस्त आणि उज्ज्वल भविष्यासाठी आवश्यक असलेल्या गुणांविषयी मार्गदर्शन केले. दरम्यान, नवीन विद्यार्थिनींचा प्रवेशोत्सवही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थिनींनी कुपवाड परिसरातून प्रभातफेरी काढून शिक्षणाचा संदेश दिला. नवागत विद्यार्थिनींचे औक्षण करून त्यांचे स्वागत करण्यात आले. तसेच सर्व विद्यार्थिनींना गोड खाऊ देण्यात आला.
आभार प्रदर्शनानंतर कार्यक्रमाची सांगता झाली. संपूर्ण कार्यक्रमात विद्यार्थिनी, पालक आणि मान्यवरांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या