सांगली, प्रतिनिधी : सांगली शहरातील विश्रामबाग परिसरात अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराचे गंभीर प्रकरण समोर आल्याने शहरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी एका तरुणाला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी २०२६ मध्ये ही घटना घडल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. तक्रारीनुसार, आरोपीने अल्पवयीन मुलीला विश्रामबाग परिसरातील एका कॅफेमध्ये बोलावून तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे. तसेच संबंधित घटनेचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत आरोपीने पीडितेशी पुन्हा संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
घटनेमुळे घाबरलेल्या पीडितेने संपूर्ण प्रकार आपल्या आईला सांगितल्यानंतर विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा नोंदवून समर्थ देवकुळे या तरुणाला अटक केली आहे. प्रकरणातील सर्व बाबींची सखोल चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, या घटनेनंतर शहरात संताप व्यक्त करण्यात येत असून विविध सामाजिक संघटनांनी आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तानच्या कार्यकर्त्यांनी संस्थापक नितीन चौगुले यांच्या नेतृत्वाखाली विश्रामबाग परिसरातील काही कॅफेंची पाहणी केली. या वेळी काही कॅफेंच्या कार्यपद्धतीबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले.
संघटनेच्या कार्यकर्त्यांनी परिसरातील विविध कॅफे व खाद्यपदार्थ विक्री केंद्रांची पाहणी केली. या कारवाईची माहिती मिळताच पोलिसांनीही घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. काही कॅफे बंद अवस्थेत आढळले, तर काही ठिकाणांचे चालकांनी दुकाने तात्पुरती बंद केल्याचे निदर्शनास आले.
या घटनेनंतर विश्रामबाग परिसरातील कॅफे व तत्सम व्यावसायिक आस्थापनांची नियमांनुसार तपासणी करण्यात यावी, अल्पवयीन मुला-मुलींच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना राबवाव्यात आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असून पोलिसांकडून पुरावे, साक्षीदारांचे जबाब आणि इतर संबंधित बाबींची पडताळणी करण्यात येत आहे. तपास पूर्ण झाल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या