करकंब (ता. पंढरपूर) : महाराष्ट्र शासनाच्या प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाविरोधात रविवारी करकंब येथे शक्तीपीठ महामार्ग विरोधी समितीच्या वतीने भव्य एल्गार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यात हजारो शेतकरी, महिला आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महामार्गाला तीव्र विरोध दर्शविला.
मेळाव्याला माजी खासदार राजू शेट्टी, खासदार धैर्यशील मोहिते-पाटील, आमदार सतेज (बंटी) पाटील, शेतकरी नेते मारुती चव्हाण, दीपक लाड, अनिल फोंडे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. उपस्थित नेत्यांनी सरकारच्या प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गावर कठोर टीका करत हा प्रकल्प तातडीने रद्द करण्याची मागणी केली.
यावेळी बोलताना राजू शेट्टी यांनी सांगितले की, "या महामार्गासाठी जालना ते सांगलीच्या वाळवा तालुक्यापर्यंत सुमारे सहा हजार एकर द्राक्षबागा बाधित होणार आहेत. त्याचबरोबर हजारो एकर केळी व डाळिंबाच्या बागांचे नुकसान होईल. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे सुमारे ६० हजार लोकांच्या रोजगारावर परिणाम होणार असून ४२ हजार एकर जमीन संपादित केली जाणार आहे. यामुळे सुमारे ४० लाख टन ऊस उत्पादन घटण्याची शक्यता असून नऊ साखर कारखाने अडचणीत येऊ शकतात."
नेत्यांनी पुढे सांगितले की, नागपूर–सोलापूर–रत्नागिरी असा महामार्ग आधीच उपलब्ध असताना नव्या शक्तीपीठ महामार्गाची आवश्यकता नाही. कोट्यवधी रुपयांचा खर्च करून सुपीक शेती उद्ध्वस्त करण्यापेक्षा सरकारने पाणी, सिंचन आणि शेती विकासाच्या योजनांवर भर द्यावा.
करकंब परिसरातील शेकडो एकर द्राक्षबागा, विहिरी, शेततळी आणि सिंचन व्यवस्था या महामार्गामुळे बाधित होणार असल्याने शेतकऱ्यांनी "एक इंचही जमीन देणार नाही" अशी ठाम भूमिका घेतली. तसेच, शासनाने जबरदस्तीने जमिनीची मोजणी करण्याचा प्रयत्न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला.
मेळाव्याच्या शेवटी "शक्तीपीठ महामार्ग रद्द झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही" असा निर्धार सर्व उपस्थित शेतकरी व नेत्यांनी व्यक्त केला. आगामी आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या