सांगली, प्रतिनिधी : सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेच्या भांडवली मूल्यावर आधारित घरपट्टीबाबत नागरिकांमध्ये निर्माण झालेला तीव्र असंतोष लक्षात घेऊन या धोरणातील त्रुटी दूर करण्यासाठी वाढीव घरपट्टी विरोधी कृती समितीशी तातडीने संयुक्त बैठक घेण्यात यावी, अशी मागणी कृती समितीने पालकमंत्री मा. चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे केली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी भांडवली मूल्यावर आधारित घरपट्टी संदर्भात नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात हरकती प्राप्त झाल्याची दखल घेतली. या धोरणात अनेक त्रुटी व चुका असल्याचे मान्य करत त्या दुरुस्त करण्यासाठी महापौरांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
या निर्णयाचे वाढीव घरपट्टी विरोधी कृती समितीने स्वागत केले असले, तरी महानगरपालिकेचे उत्पन्न वाढविण्याच्या नावाखाली भांडवलदारांना सवलती देऊन सर्वसामान्य नागरिकांवर अन्यायकारक आर्थिक भार टाकण्याचा कोणताही प्रयत्न सहन केला जाणार नाही, असा इशारा समितीने दिला आहे.
समितीच्या म्हणण्यानुसार, सध्या घरपट्टी आकारणीत अनेक गंभीर त्रुटी आहेत. खुल्या व बांधिव जागांचे दुहेरी मूल्यांकन, वापरभारांकातील विसंगती, औद्योगिक व व्यावसायिक मालमत्तांचे चुकीचे मूल्यांकन, शैक्षणिक संस्था, अनुदानित व विनाअनुदानित शाळा, सामाजिक संस्था, अनाथाश्रम, समाजमंदिरे तसेच मतिमंद मुलांच्या शाळांवर चुकीच्या पद्धतीने कर आकारणी करण्यात आली आहे. याशिवाय बिल्ट-अप एरिया, कार्पेट एरिया आणि सदनिकांच्या दरांमध्ये सरसकट आकारणी करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तसेच महापालिका क्षेत्रात प्रत्यक्षात वापरात नसलेल्या रोजगार हमी कराची आकारणी, उपयोगकर्ता कर तसेच आवश्यक उपविधी अस्तित्वात नसतानाही विविध विभागांकडून करण्यात आलेली कर आकारणी यामुळे नागरिकांना मोठा आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचे समितीने नमूद केले.
या सर्व प्रश्नांवर कायदेशीर, न्याय्य व सर्वमान्य तोडगा काढण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी वाढीव घरपट्टी विरोधी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांसोबत लवकरात लवकर संयुक्त बैठक आयोजित करून नागरिकांच्या अडचणी प्रत्यक्ष ऐकाव्यात, अशी विनंती समितीने केली आहे.
दरम्यान, सर्व नागरिकांना उद्या सकाळी १० वाजता सांगली महानगरपालिका मुख्यालय, सांगली शहर पोलीस ठाण्यासमोर आयोजित 'गांधीगिरी आंदोलनात' मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहनही समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
वाढीव घरपट्टी विरोधी कृती समितीचे प्रमुख पदाधिकारी:
सतीश साखळकर, हनमंतराव पवार, विष्णू बर्वे, रवींद्र वळवडे, डॉ. ज्ञानचंद्र पाटील, शंभूराज काटकर, आनंद देसाई, बाळासाहेब मासुळे (सर), नितीन मिरजकर आणि ओंकार माने.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या