सांगली प्रतिनिधी : सांगलीच्या शयन शेखर शेट्टी याने थायलंडमधील कोरात येथे झालेल्या जागतिक दिव्यांग स्नूकर अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक पटकावून पुन्हा एकदा भारतासह सांगलीचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल केले.
१५ ते २१ जूनदरम्यान एसपीएडीटी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, कोरात येथे झालेल्या या स्पर्धेचे आयोजन वर्ल्ड डिसॅबिलिटी बिलियर्ड्स अँड स्नूकर (WDBS) आणि स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ थायलंड यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. या स्पर्धेत १५ देशांतील ६० खेळाडूंनी सहभाग घेतला.
शयनच्या या आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील सहभागासाठी आमदार धनंजय गाडगीळ यांनी त्यांच्या पीएनजी ज्वेलर्स (स्थापना १८३२) या संस्थेमार्फत प्रायोजकत्व दिले. त्यांच्या क्रीडाप्रेमामुळेच शायनला या स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळाली.
उल्लेखनीय बाब म्हणजे, जुलै २४ ते २८ दरम्यान चीनमधील शांघाय येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय दिव्यांग स्नूकर स्पर्धेसाठी आमंत्रित होणारा शयन हा एकमेव भारतीय खेळाडू आहे. तसेच १५ ते २२ ऑगस्ट २०२६ या कालावधीत फिनलंड येथे होणाऱ्या वर्ल्डअबिलिटी स्पोर्ट्स गेम्स स्नूकर अजिंक्यपद स्पर्धेतही तो भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.
या संपूर्ण प्रवासात बिलियर्ड्स अँड स्नूकर फेडरेशन ऑफ इंडिया (BSFI) यांचेही त्याला मोलाचे सहकार्य लाभले.
आगामी स्पर्धांमध्ये सुवर्णपदक जिंकून भारत आणि सांगलीचे नाव आणखी उंचावण्याचा निर्धार शयन शेट्टीने व्यक्त केला आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या