प्रतिष्ठा न्यूज/योगेश रोकडे
मुंबई: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) सुमारे 68 हजार कर्मचाऱ्यांसाठी महायुती सरकारने मोठा आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांनाही महागाई भत्ता (DA), घरभाडे भत्ता (HRA) आणि वार्षिक वेतनवाढीचा लाभ देण्यास मंजुरी देण्यात आली असल्याची घोषणा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी सोमवारी केली.
विधानसभा आणि विधानपरिषदेत निवेदन करताना सरनाईक म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने कर्मचाऱ्यांच्या दीर्घकालीन मागण्यांना न्याय देणारा हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
या निर्णयानुसार महागाई भत्ता 32 टक्क्यांवरून 58 टक्क्यांपर्यंत वाढविण्यात आला आहे. घरभाडे भत्त्यातही वाढ करण्यात आली असून वार्षिक वेतनवाढीचा दर 2 टक्क्यांवरून 3 टक्के करण्यात आला आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे.
या निर्णयामुळे एसटी महामंडळावर दरमहा सुमारे 57 कोटी रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार पडणार असला तरी कर्मचाऱ्यांच्या न्याय्य हक्कांना प्राधान्य देत शासनाने हा निर्णय घेतल्याचे सरनाईक यांनी स्पष्ट केले. तसेच महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, वार्षिक वेतनवाढीची थकबाकी आणि इतर देणी मिळून सुमारे 5,649 कोटी रुपयांची देयके टप्प्याटप्प्याने अदा करण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, या निर्णयानंतर 29 जून रोजी प्रस्तावित धरणे आंदोलन मागे घेण्याचा निर्णय कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. हा शासन आणि कर्मचाऱ्यांमधील परस्पर विश्वासाचा विजय असल्याची भावना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केली.
"आजचा निर्णय हा केवळ वेतनवाढीचा नसून विश्वास, सन्मान आणि कर्मचाऱ्यांच्या योगदानाचा गौरव आहे. कर्मचाऱ्यांचे समाधान आणि सक्षमीकरण झाल्यास एसटी सेवा अधिक सक्षम, विश्वासार्ह आणि प्रवासी-केंद्रित बनेल," असेही सरनाईक यांनी नमूद केले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या