सांगली प्रतिनिधी : माहेश्वरी समाजाचा उत्पत्ती दिन असलेल्या महेश नवमी महोत्सवानिमित्त सांगली जिल्हा माहेश्वरी समाजाच्या वतीने भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. ही शोभायात्रा बालाजी मंदिर येथून प्रारंभ होऊन लक्ष्मीनारायण मंदिरापर्यंत मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात पार पडली.
शोभायात्रेचा शुभारंभ डीवायएसपी श्री. प्रणिल गिल्डा यांच्या हस्ते नारळ फोडून करण्यात आला. यावेळी समाजबांधवांनी मोठ्या उत्साहात उपस्थिती दर्शविली.
शोभायात्रेत सजविलेले घोडे, झांज पथक, भगवान शिव यांच्या भव्य प्रतिमेने सजलेला आकर्षक रथ तसेच भगवान महेश यांच्या जीवनावर आधारित जिवंत देखावे (झांकी) हे प्रमुख आकर्षण ठरले. माहेश्वरी समाजातील महिला, पुरुष, युवा वर्ग तसेच बालकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून शोभायात्रेची शोभा वाढविली.
मार्गावर विविध ठिकाणी समाजबांधवांच्या व संस्थांच्या वतीने पिण्याच्या पाण्याची व शीतपेयांची व्यवस्था करण्यात आली होती. कापड पेठ गणेशोत्सव मंडळाच्या वतीने भगवान शिव (महेश) यांची भव्य व मनमोहक प्रतिमा उभारून आकर्षक स्वागत सजावट करण्यात आली होती. तसेच गणपती पेठ परिसरात फटाक्यांची आतषबाजी, आकर्षक रांगोळ्या आणि स्वागत कमानींनी भाविकांचे लक्ष वेधून घेतले.
संपूर्ण परिसर पताका, फुलांची सजावट आणि धार्मिक वातावरणाने नटला होता. शोभायात्रेनंतर सर्व समाजबांधवांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास समाजबांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून सर्वत्र भक्ती, एकता आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
महेश नवमी महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी सांगली जिल्हा माहेश्वरी समाजाचे अध्यक्ष श्री. संजय सारडा, सचिव श्री. श्रीकांत मर्दा, श्री. संजय बजाज, श्री. संजय डोडिया, श्री. शैलेन्द्र बजाज, श्री. पापालाल सारडा, श्री. मनमोहन कासट, श्री. महावीर मालानी, श्री. अनिल मानधना, श्री. मुकुंद बजाज, माहेश्वरी महिला प्रदेश अध्यक्षा सौ. सरोज तोष्णीवाल, सौ. कविता मोदानी, सौ. प्रेमा गिल्डा, सौ. पूजा बियाणी तसेच श्री. राहुल मर्दा यांनी विशेष परिश्रम घेतले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या