प्रतिष्ठा न्यूज
विटा, प्रतिनिधी : प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गाविरोधात विटा येथे सोमवारी हजारो शेतकरी, माता-भगिनी आणि युवकांनी एकत्र येत प्रांत कार्यालयावर विराट लाटणे मोर्चा काढला. शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीचे निमंत्रक ॲड. दीपक लाड यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनाने शासनाचे लक्ष वेधून घेतले.रखरखत्या उन्हाची पर्वा न करता मोठ्या संख्येने महिला आणि शेतकरी मोर्चात सहभागी झाले होते. विट्यातील प्रमुख चौक सुमारे तासभर आंदोलनकर्त्यांच्या गर्दीने फुलून गेला होता. मोर्चा दरम्यान "शक्तिपीठ महामार्ग रद्द करा", "शेतकऱ्यांच्या जमिनी वाचवा" अशा घोषणा देत आंदोलनकर्त्यांनी सरकारविरोधात तीव्र संताप व्यक्त केला.यावेळी बोलताना ॲड. दीपक लाड यांनी सांगितले की, प्रस्तावित महामार्गामुळे सुपीक शेती, बागायती क्षेत्र, घरे, विहिरी तसेच शेतीपूरक व्यवसाय धोक्यात येणार आहेत. ग्रामीण भागाच्या सामाजिक व आर्थिक जीवनावर गंभीर परिणाम होणार असल्याने शेतकरी हा प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत स्वीकारणार नाहीत.शासनाने बाधित शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन शक्तिपीठ महामार्गाचा प्रस्ताव तात्काळ रद्द करावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. शेतकऱ्यांच्या जमिनी, पिके आणि भवितव्य वाचविण्यासाठी हा लढा अखेरपर्यंत सुरू राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.मोर्चामध्ये श्रीदास होनमाने, कॉ. धनाजी गुरव, दीपक कदम, बी. जी. काका पाटील, ॲड. सुभाष बापू पाटील, कॉ. उमेश देशमुख, चंद्रकांत चव्हाण, चंद्रकांत पाटील, महेश कुपाडे, सुषमाताई जाधव, नयनाताई पाटील, प्रतिभाताई काटकर, अमृता कुपाडे, गजानन सुतार, गणेश शेवाळे, महादेवराव होवाळ यांच्यासह हजारो माता-भगिनी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.शक्तिपीठ महामार्गाविरोधातील या विराट मोर्चामुळे सांगली जिल्ह्यातील आंदोलनाला नवे बळ मिळाले असून, बाधित शेतकरी निर्णायक लढ्यासाठी सज्ज असल्याचे चित्र विट्यात पाहायला मिळाले.
शक्तिपीठ महामार्गाविरोधात ॲड दीपक लाड यांच्या नेतृत्वाखाली विट्यात हजारो शेतकरी व माता-भगिनींचा विराट लाटणे मोर्चा
By -
जून २२, २०२६
0
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या