सांगली, दि. २२ : सांगली-सातारा स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे उमेदवार धैर्यशील ज्ञानदेव कदम यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार अभयसिंह खाशेराव जगताप यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव करत दणदणीत विजय मिळवला. या निकालामुळे सांगली-सातारा राजकारणात महायुतीने आपले वर्चस्व सिद्ध केले असून महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे.
सांगलीतील तरुण भारत व्यायाम मंडळ येथे सोमवारी कडेकोट पोलीस बंदोबस्तात मतमोजणी पार पडली. सकाळी ८ वाजता निवडणूक निरीक्षक डॉ. अमित सैनी आणि जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. मैनाक घोष यांच्या उपस्थितीत स्ट्राँग रूम उघडण्यात आली. त्यानंतर मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली.
निकालानुसार धैर्यशील कदम यांना ५९३ मते मिळाली, तर अभयसिंह जगताप यांना २९२ मते मिळाली. अपक्ष उमेदवार किशोर हणमंत धुमाळ यांना एकही मत मिळाले नाही. एकूण ८९५ मतदारांपैकी ८९४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. त्यापैकी ८८५ मते वैध ठरली, तर ९ मते अवैध ठरली. विजयासाठी आवश्यक कोटा ४४३ मतांचा होता.
मतमोजणीसाठी पाच टेबलांची व्यवस्था करण्यात आली होती. प्रत्येक टेबलवर मतमोजणी पर्यवेक्षक, सहाय्यक आणि शिपाई यांची नियुक्ती करण्यात आली होती. संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक आणि सुरळीत पार पडावी यासाठी प्रशासनाने विशेष काळजी घेतली.
निकाल जाहीर होताच महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करत विजयाचा आनंद साजरा केला. धैर्यशील कदम यांच्या विजयामुळे सांगली-सातारा स्थानिक प्राधिकारी मतदारसंघात महायुतीची ताकद पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या