सांगली, प्रतिनिधी : शहरातील संजयनगर परिसरातील डॉ. लिमये रोडवरील वर्षी फोटो स्टुडिओ परिसरात रविवारी मध्यरात्री अज्ञात व्यक्तींनी पाच घरांवर दगडफेक केल्याची घटना घडली. या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली आहे.
रात्री सुमारे ११.४५ वाजण्याच्या सुमारास अचानक घरांवर दगड आदळल्याचे मोठे आवाज झाल्याने नागरिक झोपेतून जागे झाले. घराबाहेर येऊन पाहणी केली असता परिसरातील पाच घरांना लक्ष्य करून दगडफेक करण्यात आल्याचे उघड झाले. काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
या घटनेत दगडू फोंडे यांच्या घरावर चार दगड फेकण्यात आले. त्यापैकी दोन दगड सिमेंटच्या पत्र्यावर आदळून पत्रा फुटला आणि दगड घरात पडले. आनंद मासाळ यांच्या घराच्या पत्र्यावर दोन दगड आदळले. रमेश आयवळे यांच्या घरावरही दगडफेक करण्यात आली. मंगल सरगर यांच्या घरावर एक दगड फेकण्यात आला, तर सुरेंद्र दुपटे यांच्या घराच्या गच्चीवर दोन दगड पडल्याचे आढळून आले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर नागरिकांनी पोलिसांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर ‘११२’ आपत्कालीन सेवेला कळविण्यात आले. फोन आल्यानंतर अवघ्या तीन मिनिटांत पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिसराची पाहणी करून नागरिकांकडून माहिती घेतली.
परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी करण्यात आली. मात्र, त्यामध्ये कोणतीही संशयास्पद हालचाल अथवा दगडफेक करणाऱ्यांचा मागमूस आढळून आला नाही. त्यामुळे ही दगडफेक नेमकी कोणी आणि कोणत्या कारणातून केली, याबाबतचे गूढ कायम आहे.
शहराच्या मध्यवर्ती भागात घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत असून, दगडफेक करणाऱ्यांचा तातडीने शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक रहिवाशांकडून करण्यात येत आहे.
‘११२’ प्रतिसाद यंत्रणेची तत्परता
दगडफेकीनंतर नागरिकांनी ‘११२’ आपत्कालीन सेवेशी संपर्क साधला. कॉल मिळाल्यानंतर अवघ्या तीन मिनिटांत पोलीस वाहन घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तात्काळ पाहणी करून माहिती संकलित केली व पुढील तपास सुरू केला.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या