प्रतिष्ठा न्यूज
सांगली, प्रतिनिधी : न्यू एज्युकेशन सोसायटी, सांगली संचलित श्रीमती सुंदराबाई दडगे हायस्कूल व वी.रा. वेलणकर बालविद्यालय, सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी क्रीडा शिक्षिका रुकसाना मुलाणी यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. कार्यक्रमासाठी योग मार्गदर्शक रेशमा निकाळजे व प्रशांत कोळेकर हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांचा मुख्याध्यापक सुहास कोळी व प्रभारी पर्यवेक्षिका वैशाली कणिरे यांच्या हस्ते गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
योग मार्गदर्शकांनी योगाचे महत्त्व, निरोगी जीवनासाठी योगाची आवश्यकता तसेच नियमित योगाभ्यासाचे विविध फायदे याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी विविध योगासनांची प्रात्यक्षिके करून दाखवली. विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्त सहभाग घेत योगासनांचा सराव केला.
या कार्यक्रमात सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनी, शिक्षक- शिक्षिका, मुख्याध्यापक, मुख्याध्यापिका व पर्यवेक्षिका यांनी उत्साहाने सहभाग नोंदवला. याप्रसंगी वी.रा. वेलणकर बालविद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुवर्णा गायकवाड यांचीही प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्चना जंगम यांनी केले, तर रमेश अहिरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
योगामुळे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य जपले जाते, हा संदेश देत कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या