सांगली प्रतिनिधी : येथील एमआयटी विश्वशांती गुरुकुल स्कूल (MIT VGS) कॅम्पसमध्ये 'हॅच ड्रीम रोबोटिक्स सेंटर' आणि 'एमआयटी विश्वशांती गुरुकुल स्कूल सांगली' यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'संकल्पना - सांगली स्टेम (S.T.E.M) चॅलेंज २०२६' या जिल्हास्तरीय स्पर्धेचा शानदार समारोप आज पार पडला. या स्पर्धेत इयत्ता तिसरी ते बारावीपर्यंतच्या सुमारे १५० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून रोबोटिक्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आणि नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान क्षेत्रात आपले कौशल्य सादर केले.
या विशेष सोहळ्यासाठी मुख्य अतिथी म्हणून *गोव्याचे सहकार व जलसंपदामंत्री शिरोडकर* उपस्थित होते. तर मानद अतिथी म्हणून गोव्यातील क्युरियस माइंड इन्फोटेनमेंटचे संचालक योगेश केरकर, सचिन शिरोडकर आणि सीए (CA) व अंतर्गत लेखापरीक्षक श्री. विजय नावंधर उपस्थित होते. तसेच हॅच ड्रीम रोबोटिक्स सेंटरच्या संस्थापिका व मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. हेमांगी खराडे पाटील यांच्यासह एमआयटी व्हीजीएसचे प्राचार्य श्री. चेतन सोनावणे व व्यवस्थापनाचे प्रतिनिधी मंचावर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि उद्घाटनपर भाषण एमआयटी व्हीजीएसचे प्राचार्य श्री. चेतन सोनावणे यांनी केले. तसेच यावेळी प्रमुख पाहुण्यांचा सत्कार श्री. चेतन सोनावणे आणि सौ. हेमांगी खराडे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना, "जीवन जगण्याची कला शिकण्यासाठी शिका," असे प्रतिपादन गोव्याचे जलसंपदा व सहकारमंत्री श्री. सुभाष शिरोडकर यांनी केले. त्यांनी पुढे बोलताना तंत्रज्ञान आणि शिक्षणाची सांगड घालून विद्यार्थ्यांनी देशाच्या प्रगतीमध्ये योगदान देण्याचे आवाहन केले.
दिवसभर चाललेल्या या आव्हानात्मक स्पर्धेसाठी एमआयटी स्कूलच्या वतीने ६ अद्ययावत वर्गखोल्या आणि मुख्य सभागृह उपलब्ध करून देण्यात आले होते, जिथे विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विविध विज्ञान आणि रोबोटिक्स मॉडेल्सचे सादरीकरण व स्पर्धा घेण्यात आल्या. तंत्रज्ञानाच्या युगात शालेय स्तरापासूनच विद्यार्थ्यांना रोबोटिक्स आणि एआयचे उत्तम व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला होता.
*या कार्यक्रमाला संस्थेच्या विश्वस्त व महासचिव सौ. स्वाती कराड चाटे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले*. या यशस्वी आयोजनाबद्दल हॅच ड्रीम रोबोटिक्स सेंटरच्या वतीने एमआयटी व्यवस्थापन, शिक्षक वर्ग आणि स्वयंसेवकांचे विशेष आभार मानण्यात आले. या सोहळ्यासाठी सांगली जिल्ह्यातील शेकडो विद्यार्थी आणि त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या