सांगली प्रतिनिधी : भारती विद्यापीठाच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यार्थी, प्राध्यापक आणि कर्मचारी यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण महाविद्यालय परिसर योगमय झाला.
कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. (डॉ.) व्ही. ए. रणखांबे तसेच उपप्राचार्य डॉ. अमित सुपले यांची प्रमुख उपस्थिती लाभली. महाविद्यालयातील सीनियर, ज्युनियर व व्होकेशनल विभागातील प्राध्यापक, राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी) कॅडेट्स तसेच राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विभागाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
या प्रसंगी योग प्रशिक्षक विक्रम पवार आणि योगेश सर यांनी विविध योगासने, प्राणायाम व ध्यान यांचे प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केले. योगामुळे शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक स्वास्थ्य, एकाग्रता आणि सकारात्मक जीवनशैली कशी विकसित होते, याविषयी त्यांनी उपस्थितांना सविस्तर माहिती दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी, प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांनी उत्साहाने योगाभ्यास करून निरोगी जीवनशैलीचा संकल्प केला.
कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक डॉ. अमर तुपे, एनसीसी विभाग प्रमुख लेफ्ट. डॉ. महेश कोल्हाळ आणि एनएसएस विभाग प्रमुख डॉ. रुपाली कांबळे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थितांनी आयोजकांचे कौतुक केले.
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये आरोग्य, शिस्त, आत्मविश्वास आणि निरोगी जीवनशैलीबाबत जनजागृती झाली. तसेच समाजोपयोगी आणि विद्यार्थी-केंद्रित उपक्रमांच्या माध्यमातून महाविद्यालयाच्या सामाजिक व शैक्षणिक बांधिलकीचे दर्शन घडले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या