प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:शिक्षण क्षेत्रात तब्बल ३६ वर्षे प्रामाणिकपणे आणि समर्पित भावनेने सेवा बजावणारे बालशाळा तासगावचे मुख्याध्यापक सुभाष दादा बल्लाळ यांच्या सेवानिवृत्ती निमित्त आयोजित सत्कार व निरोप समारंभ नुकताच काळे बालक मंदिर,तासगाव येथे अत्यंत भावपूर्ण आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाचा यावेळी मान्यवरांनी गौरव करत त्यांना भावपूर्ण निरोप दिला.समारंभास सांगली शिक्षण संस्थेचे संचालक रवींद्र देवधर,प्रशासकीय अधिकारी बाळकृष्ण पाटणकर,संस्थेचे माजी कार्यवाह शशिकांत देशपांडे तसेच माजी अध्यक्ष अरविंदराव मराठे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमात शिक्षक,मुख्याध्यापक, कर्मचारी,माजी विद्यार्थी आणि बल्लाळ सरांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.यावेळी बोलताना संचालक रवींद्र देवधर यांनी सुभाष बल्लाळ यांच्या ३६ वर्षांच्या सेवाकाळाचा गौरव करताना सांगितले की, “वक्तशीरपणा,शिस्तप्रियता आणि कामावरील अपार निष्ठा यांचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे बल्लाळ सर,वेळेचे काटेकोर पालन हा त्यांचा स्थायीभाव असून ‘उशीर’ हा शब्द त्यांच्या शब्दकोशातच नाही.आजही त्यांची ऊर्जा, कार्यक्षमता आणि सकारात्मक दृष्टिकोन तरुण शिक्षकांसाठी प्रेरणादायी आहे.”कार्यक्रमाच्या प्रारंभी अधीक्षक योगेश खाडीलकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले.त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते बल्लाळ सर आणि त्यांच्या कुटुंबीयांचा शाल,श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तसेच शाळेच्या वतीने विशेष मानपत्र प्रदान करून त्यांच्या शैक्षणिक कार्याचा गौरव करण्यात आला.या प्रसंगी सकटे सर, गायकवाड सर, बेडगे सर,केंगळे सर, लालासाहेब माळी सर,प्रकाश खरमाटे आणि जोग सर यांनी आपल्या मनोगतातून बल्लाळ सरांच्या कार्यपद्धती, शिस्तप्रिय स्वभाव आणि विद्यार्थ्यांप्रती असलेल्या प्रेमळ वृत्तीच्या आठवणींना उजाळा दिला. त्यांच्या सहवासातील अनुभव कथन करताना अनेकांचे कंठ दाटून आले.कुटुंबीयांच्या वतीने त्यांच्या सुविद्य पत्नी तसेच मुलगा आणि मुलीने भावना व्यक्त करत बल्लाळ सरांनी कुटुंब आणि समाज यांच्यात साधलेला समतोल अधोरेखित केला. त्यांच्या मनोगतामुळे सभागृहातील वातावरण भावूक झाले.
सत्काराला उत्तर देताना बल्लाळ सर यांनी आपल्या ३६ वर्षांच्या सेवाकाळातील अनेक आठवणींना उजाळा दिला. संस्थेने दिलेल्या संधींबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना त्यांनी, “सेवानिवृत्तीनंतरही संस्थेला किंवा शाळेला माझी गरज भासल्यास मी सदैव योगदान देण्यासाठी तत्पर राहीन,” अशी भावना व्यक्त केली.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन राव सर यांनी केले तर सूत्रसंचालन गौरी फौजदार यांनी प्रभावीपणे केले.या समारंभास नूतन मुख्याध्यापिका सौ.रुक्मिणी गायकवाड,सहज ध्यान योगचे सदस्य,संचालक अरुण थोरात, तासगाव संकुलातील विविध शाळांचे मुख्याध्यापक, आजी-माजी शिक्षक, कर्मचारी तसेच बल्लाळ सरांचे असंख्य हितचिंतक उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मराठे बालशाळा, काळे बालक मंदिर आणि खुजट बालविहार येथील सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. सुभाष बल्लाळ यांच्या कार्याचा गौरव करणारा हा समारंभ उपस्थितांच्या स्मरणात कायम राहील, अशा भावना शेवटी व्यक्त करण्यात आल्या.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या