प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : तासगाव तालुका कुंभार समाज संघटनेच्या वतीने आयोजित गुणवंत विद्यार्थी,विशेष प्राविण्य प्राप्त युवक-युवती तसेच त्यांच्या पालकांच्या सत्कार समारंभाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. समाजातील विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव करत त्यांना पुढील वाटचालीसाठी प्रेरणा देण्याच्या उद्देशाने आयोजित हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला.कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सांगली जिल्हा कृषी अधिकारी विवेक कुंभार आणि सातारा कार्यकारी अभियंता संतोष कुंभार उपस्थित होते.कार्यक्रमाच्या प्रारंभी सौ.सोनाली किरण कुंभार यांनी मान्यवरांचे स्वागत करून उपस्थितांचे स्वागत केले.यावेळी मार्गदर्शन करताना विवेक कुंभार यांनी समाजाच्या प्रगतीसाठी एकजुटीचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले, “जोपर्यंत समाज एकत्र येत नाही, तोपर्यंत समाजाची सर्वांगीण उन्नती शक्य नाही. विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम करून गुणवत्ता मिळवली आहे.आजच्या स्पर्धात्मक युगात अर्ध्या-एक मार्कावर निकाल लागत आहेत. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने आत्मविश्वासाने आणि जिद्दीने अभ्यास करून सर्व क्षेत्रांत पुढे जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण कोणापेक्षाही कमी नाही,ही भावना मनात ठेवून यशाच्या दिशेने वाटचाल करावी.”यावेळी त्यांनी शेतकऱ्यांसाठी शासनाच्या विविध योजनांची माहिती देत त्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहनही केले.
सातारा येथील कार्यकारी अभियंता संतोष कुंभार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “भविष्यातील काळ अधिक स्पर्धात्मक आणि आव्हानात्मक असणार आहे.त्यामुळे विद्यार्थ्यांनी अधिकाधिक गुण मिळवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावेत. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी अशा प्रकारचे सत्कार समारंभ अत्यंत आवश्यक आहेत.समाजाने गुणवंतांचा सन्मान करून त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण केला पाहिजे.”स्वीकृत नगरसेवक ऍड तुकाराम कुंभार यांनीही मनोगत व्यक्त करताना समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव होणे काळाची गरज असल्याचे सांगितले. “विद्यार्थ्यांना सन्मान आणि बक्षीस मिळाले की त्यांच्यात अधिक मेहनत घेण्याची प्रेरणा निर्माण होते.यावेळी कार्यक्रमाचे वृत्त संकलन करताना,हा कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव करण्याबरोबरच इतरांना प्रेरणा देणारा आहे,”असे सोमनाथ कुंभार यांनी सांगितले.तसेच त्यांनी कार्यक्रमा दरम्यान विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेबरोबरच चांगला समाज घडविण्याचे महत्त्वही अधोरेखित केले..यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांना सर्टिफिकेट,वही,पेन आणि गुलाबपुष्प देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच विविध क्षेत्रांत विशेष प्राविण्य मिळवलेल्या युवक-युवती आणि त्यांच्या पालकांचा शाल व श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला.यां कार्यक्रमास साप्ताहिक कुंभशिल्पचें संपादक नितीन कुंभार यांचे विशेष सहकार्य लाभले.यावेळी सार्थक सुनील गायकवाड याची इंडियन एअर फोर्समध्ये एअरमन पदावर निवड झाल्याबद्दल समाजाच्या वतीने त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.त्यांच्या यशामुळे उपस्थितांमध्ये अभिमानाचे वातावरण निर्माण झाले. कार्यक्रमाच्या शेवटी सचिन कुंभार यांनी आभार मानले.या प्रसंगी तालुक्यातील कुंभार समाजाचे पदाधिकारी, समाजबांधव,पालक, विद्यार्थी आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.गुणवंतांचा गौरव आणि समाज एकजुटीचा संदेश देणारा हा कार्यक्रम सर्वांसाठी प्रेरणादायी ठरला.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या