सांगली, प्रतिनिधी : सांगली जिल्हा शिक्षक संघटना समन्वय समितीच्या नावाचा गैरवापर करणाऱ्या तथाकथित ‘तोतया’ पदाधिकाऱ्यांविरोधात जिल्ह्यातील 21 शिक्षक संघटना एकवटल्या असून, अशा व्यक्तींना संघटनांमधून हद्दपार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच समन्वय समितीची पदे चुकीच्या पद्धतीने वापरणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला.
एक वर्षापूर्वी तत्कालीन समन्वय समिती अध्यक्षांना बहुमताने पदावरून दूर करण्यात आले होते. त्यानंतर 17 संघटनांच्या पाठिंब्याने महेश शरनाथे यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. सध्या समन्वय समितीला 21 संघटनांचा पाठिंबा असल्याचा दावा पदाधिकाऱ्यांनी केला.
समन्वय समितीचे अध्यक्ष महेश शरनाथे, सरचिटणीस सदाशिव वारे, सहसरचिटणीस शशिकांत पाटील, कार्याध्यक्ष संतोष कदम, उपाध्यक्ष दिवाणजी देशमुख आणि प्रसिद्धीप्रमुख चंद्रशेखर क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली समिती कार्यरत आहे. नव्याने शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष विनायक शिंदे, दिव्यांग संघटनेचे जिल्हाध्यक्ष अन्सार तांबोळी आणि अखिल महाराष्ट्र शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष मुकुंद पंडित यांनी समितीला पाठिंबा जाहीर केला.
यावेळी बोलताना विनायक शिंदे यांनी समन्वय समितीच्या नावाचा वापर करून विविध ठिकाणी हस्तक्षेप करणाऱ्या व्यक्तींविरोधात सर्व संघटनांनी एकत्र येण्याचे आवाहन केले. अखिल महाराष्ट्र शिक्षक संघाचे माजी अध्यक्ष भानुदास चव्हाण यांनी, संबंधित व्यक्तीने राजीनामा देण्याचे आश्वासन दिले होते; मात्र वर्ष उलटूनही समन्वय समितीचे पद वापरले जात असल्याचा आरोप केला.
सरचिटणीस सदाशिव वारे यांनी समन्वय समितीची पदे किंवा नाव चुकीच्या पद्धतीने वापरणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट केले. सहसरचिटणीस शशिकांत पाटील यांनी कोणत्याही शिक्षक संघटनेचा अध्यक्ष किंवा सरचिटणीस नसलेली व्यक्ती तांत्रिकदृष्ट्या समन्वय समितीची सदस्यही होऊ शकत नसल्याचे सांगितले.
अध्यक्ष महेश शरनाथे यांनी, पूर्वी 17 संघटनांचा पाठिंबा असताना आता 21 संघटना समन्वय समितीच्या पाठीशी उभ्या राहिल्या असून समिती अधिक भक्कम झाली असल्याचे सांगितले. प्रसिद्धीप्रमुख चंद्रशेखर क्षीरसागर यांनी शिक्षण क्षेत्राच्या हितासाठी यापूर्वी संयम बाळगला होता; मात्र यापुढे समन्वय समितीच्या नावाचा गैरवापर करणाऱ्यांचा पर्दाफाश करण्यात येईल, असा इशारा दिला.
या बैठकीस महेश शरनाथे, सदाशिव वारे, संतोष कदम, शशिकांत पाटील, चंद्रशेखर क्षीरसागर, दिवाणजी देशमुख, मुकुंद सूर्यवंशी, विनायक शिंदे, अरविंद गावडे, मुरलीधर दोडके, प्रमोद काकडे, मनोहर साबळे, रमेश पेटकर, उत्तम इंगळे, राजेंद्र कांबळे, परशुराम जाधव, अन्सार तांबोळी, अजय राक्षे, बाबासो जानकर आणि मुकुंद पंडित यांच्यासह विविध शिक्षक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
बैठकीचे प्रास्ताविक सदाशिव वारे यांनी केले, तर आभार प्रदर्शन चंद्रशेखर क्षीरसागर यांनी मानले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या