सांगली, दि. ५ जून : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत निर्धार फौंडेशनच्या वतीने कृष्णा नदीच्या प्रदूषणमुक्तीसाठी सांगलीतील कृष्णा नदी घाट परिसरात विशेष स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानात जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष व महापालिका आयुक्त संजिता महापात्र यांनी प्रत्यक्ष श्रमदान करून नागरिकांना नदी स्वच्छतेचा संदेश दिला.जिल्हाधिकारी यांनी यावेळी निर्धार फौंडेशनच्या स्वच्छतादूतांशी संवाद साधला.
ज्या कृष्णा नदीच्या जलावर सांगली जिल्ह्याची समृद्धी उभी आहे, तीच नदी आज प्रदूषणाच्या विळख्यात अडकत चालल्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. भविष्यात या पवित्र नदीचेही नाल्यात रूपांतर होण्याची भीती व्यक्त होत असताना निर्धार फौंडेशनच्या माध्यमातून "जयतु कृष्णे" अभियानांतर्गत मागील अनेक महिन्यांपासून सातत्याने जनजागृती व स्वच्छता उपक्रम राबविले जात आहेत. त्याच अभियानाचा भाग म्हणून हे विशेष स्वच्छता अभियान आयोजित करण्यात आले.
यावेळी बोलताना जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष म्हणाले, नदी स्वच्छता ही प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे. नदी संवर्धनासाठी काम करणाऱ्या संस्था व स्वयंसेवकांचे कार्य कौतुकास्पद आहे. नागरिकांनीही या अभियानात सक्रिय सहभाग घेऊन नदी प्रदूषण रोखण्यासाठी पुढाकार घ्यावा व स्वतःकडून कोणत्याही प्रकारची घाण होणार नाही याची काळजी घ्यावी.
महापालिका आयुक्त संजिता महापात्र म्हणाल्या, निर्धार फौंडेशन आणि सर्व सांगलीकरांसोबत या अभियानात सहभागी होताना आनंद होत आहे. कृष्णा नदीला आपण आईचे स्थान देतो, त्यामुळे तिचे संवर्धन करणे ही प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त प्रत्येक नागरिकाने स्वतःपासून बदलाची सुरुवात करण्याचा संकल्प करावा. या मोहिमेसाठी आवश्यक ते सर्व सहकार्य महापालिकेकडून करण्यात येईल. वर्षानुवर्षे स्वच्छतेसाठी कार्य करणाऱ्या सर्व स्वयंसेवकांचे अभिनंदन असून, प्रशासन, सामाजिक संस्था आणि नागरिक यांच्या एकजुटीतून या चळवळीला अधिक बळ मिळेल.
निर्धार फौंडेशनचे संस्थापक राकेश दड्डणावर म्हणाले, आज आपण जे कृष्णामाईचे पाणी पितो, तेच पाणी भावी पिढ्यांनाही सुरक्षित व स्वच्छ स्वरूपात मिळावे या भावनेतून आम्ही युवक कार्यरत आहोत. आज जिल्हाधिकारी साहेब व आयुक्त मॅडम यांनी प्रत्यक्ष श्रमदान करून आम्हा युवकांच्या कार्याला पाठबळ दिले, ही आमच्यासाठी प्रेरणादायी बाब आहे. प्रत्येक सांगलीकराने या अभियानात सहभागी होऊन कृष्णा नदी स्वच्छ, सुंदर आणि प्रदूषणमुक्त करण्यासाठी हातभार लावावा, हीच अपेक्षा आहे.
या स्वच्छता अभियानात प्रकाश जोशी, रोहित मोरे, धनंजय हंकारे, गणेश जलवादे, अनिरुद्ध कुंभार, किरण बेळुंकी, भाग्यश्री दिवाळकर, सूरज पाटील यांच्यासह अनेक स्वयंसेवकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या