महाराष्ट्रात स्पर्धा व पात्रता परीक्षांमधील गैरप्रकार पुन्हा एकदा समोर आला असून, रविवार (२८ जून) रोजी होणारी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) पेपरफुटीच्या संशयामुळे पुढे ढकलण्यात आली आहे. भिवंडी येथे पोलिसांनी केलेल्या कारवाईदरम्यान काही व्यक्तींकडे टीईटीच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांशी साधर्म्य असलेली माहिती आढळून आल्याने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेला हा महत्त्वपूर्ण निर्णय घ्यावा लागला. यामुळे राज्यभरातील लाखो परीक्षार्थ्यांची परीक्षा ऐनवेळी रद्द झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये संताप आणि निराशेचे वातावरण निर्माण झाले आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे राज्यातील एकूण १,०२८ परीक्षा केंद्रांवर टीईटी-२०२६ परीक्षा आयोजित करण्यात आली होती. अलीकडील विविध परीक्षांतील गैरप्रकार लक्षात घेऊन परीक्षा सुरक्षित आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी विशेष खबरदारी घेण्यात आल्याचे परिषदेकडून सांगण्यात आले होते. मात्र, परीक्षेच्या आदल्या दिवशीच भिवंडी पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीमुळे संपूर्ण प्रकार उघडकीस आला.
पोलिसांनी शनिवारी पहाटे भिवंडी परिसरात धाड टाकून काही संशयितांची चौकशी केली. त्यांच्याकडे असलेल्या माहितीची महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांकडून पडताळणी करण्यात आली. या पडताळणीत संबंधितांकडे असलेले काही प्रश्न टीईटी-२०२६ च्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांशी जुळत असल्याचे आढळून आले. त्यानंतर भिवंडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे.
या घटनेची गंभीर दखल घेत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून रविवारची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. परीक्षा पूर्णपणे पारदर्शक आणि निष्पक्ष वातावरणातच होणे आवश्यक असल्याने तसेच संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी होईपर्यंत परीक्षा घेणे योग्य ठरणार नसल्याचे परिषदेने स्पष्ट केले आहे. परीक्षेच्या नव्या तारखेबाबतची माहिती लवकरच महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.
दरम्यान, या प्रकरणात काही संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. प्रश्नपत्रिका त्यांच्यापर्यंत कशी पोहोचली, त्यामागे कोणते रॅकेट कार्यरत आहे का, तसेच या प्रकरणात इतर कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास सुरू आहे. आवश्यकतेनुसार संबंधितांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
ऐनवेळी परीक्षा पुढे ढकलल्यामुळे राज्यभरातील लाखो उमेदवारांचा मानसिक, आर्थिक आणि शैक्षणिक फटका बसला आहे. अनेक विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रवासाचे नियोजन केले होते, तर काहींनी निवासाची व्यवस्था देखील केली होती. त्यामुळे परीक्षा स्थगित करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
या घटनेवर राजकीय प्रतिक्रिया देखील उमटू लागल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी सरकारवर टीका करत, "टीईटीचा पेपर फुटणे म्हणजे लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्यावर घाला आहे. प्रत्येक वेळी पेपरफुटी, चौकशी आणि अटक यापलीकडे काहीच होत नाही. विद्यार्थ्यांच्या वेळेची, मेहनतीची आणि आर्थिक नुकसानीची भरपाई कोण करणार?" असा सवाल उपस्थित केला आहे.
राज्यात वारंवार घडणाऱ्या पेपरफुटीच्या घटनांमुळे परीक्षा व्यवस्थेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, दोषींवर कठोर कारवाई करून परीक्षा प्रक्रिया अधिक सुरक्षित आणि पारदर्शक करण्याची मागणी विद्यार्थी, पालक आणि विविध संघटनांकडून होत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या