मुंबई, प्रतिनिधी : महाराष्ट्रातील आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तक तसेच मासिक २१ हजार रुपयांपेक्षा कमी वेतन असलेल्या कंत्राटी (एनएचएम) कर्मचाऱ्यांना राज्य कामगार विमा योजना (ESIS) लागू करण्याबाबतचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्यमंत्री श्री. प्रकाश आबिटकर यांनी दिले आहेत. या निर्णयाचे महाराष्ट्र राज्य आशा गटप्रवर्तक व आरोग्य कर्मचारी संघटनेच्या वतीने स्वागत करण्यात येत असून, आरोग्यमंत्री श्री. आबिटकर यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात येत आहेत.
मंत्रालयातील आरोग्यमंत्र्यांच्या समिती कक्षात आयोजित बैठकीत आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तक, आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचारी तसेच पतसंस्था कर्मचारी, रेशन दुकान कर्मचारी, खाजगी शाळांचे कर्मचारी, स्वयंरोजगार संस्था आणि सार्वजनिक वाचनालयातील कर्मचारी अशा अल्प उत्पन्न गटातील कर्मचाऱ्यांना राज्य कामगार विमा योजनेचा लाभ देण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
राज्यात सुमारे ७० हजार आशा स्वयंसेविका आणि सुमारे ४ हजार गटप्रवर्तक कार्यरत असून, सार्वजनिक आरोग्य विभागाच्या विविध योजना आणि उपक्रम सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात त्यांचे योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियान आणि १०८/१०२ आपत्कालीन वैद्यकीय सेवेमध्ये कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांचेदेखील आरोग्य व्यवस्थेमध्ये मोठे योगदान आहे. मात्र कंत्राटी स्वरूपातील नियुक्तीमुळे या कर्मचाऱ्यांना नियमित कर्मचाऱ्यांप्रमाणे सामाजिक सुरक्षा आणि आरोग्य संरक्षणाचे लाभ मिळत नाहीत.
ईएसआयएस योजनेच्या माध्यमातून वैद्यकीय उपचार, अपघात विमा, गंभीर आजारांवरील सहाय्य, मातृत्व लाभ आणि कुटुंबीयांसाठी आरोग्य संरक्षण उपलब्ध होणार असल्यामुळे राज्यातील हजारो आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तक आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
मात्र, केवळ घोषणा आणि निर्देश पुरेसे नसून या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी होणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी राज्यातील आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तक आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी संघटित राहून सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि संघर्ष करणे गरजेचे आहे.
यापूर्वीही आशा स्वयंसेविकांना मोबाईल किंवा लॅपटॉप उपलब्ध करून देण्याबाबत अनेक वेळा घोषणा करण्यात आल्या होत्या, मात्र प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. त्यामुळे कोणत्याही घोषणेबाबत प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत संयम राखणे आणि केवळ श्रेय घेण्यासाठी केले जाणारे दावे किंवा दिशाभूल करणाऱ्या प्रचारावर विश्वास न ठेवणे आवश्यक आहे.
महाराष्ट्र राज्य आशा गटप्रवर्तक व आरोग्य कर्मचारी संघटना या विषयाचा सातत्याने पाठपुरावा करीत राहील आणि ईएसआयएस योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी होईपर्यंत संघर्ष सुरू ठेवेल.
-कॉ. सुमन शंकर पुजारी
जनरल सेक्रेटरी
महाराष्ट्र राज्य आशा गटप्रवर्तक व आरोग्य कर्मचारी संघटना
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या