सांगली प्रतिनिधी : मराठा समाज, सांगली संस्थेच्या वतीने राजर्षी शाहू महाराज यांची १५२ वी जयंती अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रारंभी संस्थेचे उपाध्यक्ष दत्तात्रय सावंत, खजिनदार ॲड. विलासराव हिरूगडे पवार आणि ज्येष्ठ कार्यकारिणी सदस्य बाबासाहेब भोसले यांच्या हस्ते राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी उपाध्यक्ष दत्तात्रय सावंत यांनी आपल्या मनोगतात राजर्षी शाहू महाराज हे सामाजिक क्रांतीचे अग्रदूत, थोर समाजसुधारक आणि रयतेचे कल्याणकारी राजे होते, असे गौरवोद्गार काढले.
खजिनदार ॲड. विलासराव हिरूगडे पवार यांनी शाहू महाराजांनी रयतेचे कल्याण हेच ध्येय समोर ठेवून राज्यकारभार केला. शिक्षण, सामाजिक न्याय आणि वंचित घटकांच्या उन्नतीसाठी त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याचे सांगितले.
संस्थेचे माजी अध्यक्ष प्रकाश चव्हाण यांनी आपल्या भाषणात राजर्षी शाहू महाराजांचे सांगली व मिरज शहरांशी असलेले अतूट ऐतिहासिक नाते विविध दाखल्यांसह उपस्थितांसमोर मांडले.
ॲड. उत्तमराव निकम यांनी राजर्षी शाहू महाराजांनी अस्पृश्यतेविरुद्ध ठाम भूमिका घेत सामाजिक समतेचा पुरस्कार केला. गौतम बुद्ध, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याशी सुसंगत विचार आणि कृतीमुळे त्यांनी जनमानसात अढळ स्थान निर्माण केले, असे प्रतिपादन केले.
प्रमोद शिंदे यांनी शाहू महाराजांनी आयुष्यभर जातीभेद आणि अस्पृश्यता निर्मूलनासाठी सातत्याने संघर्ष केला आणि सामाजिक परिवर्तनाची प्रभावी चळवळ उभी केली, असे सांगितले.
याप्रसंगी संस्थेचे माजी अध्यक्ष रघुनाथराव पाटील, कार्यकारिणी सदस्य प्रा. शशिकांत जाधव, विक्रमसिंह पाटील सावर्डेकर तसेच संस्थेचे कर्मचारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या