प्रतिष्ठा न्यूज
पलूस प्रतिनिधी : चार्टर्ड अकाउंटंट (सीए) परीक्षा उत्तीर्ण झालेल्या श्रेयश राजाराम साळुंखे तसेच भारतीय सैन्यात लेफ्टनंटपदी आणि भारतीय नौदलात सब-लेफ्टनंटपदी नुकतीच नियुक्ती झालेल्या पलूस येथील प्रथमेश संतोष यादव यांचा स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मृती गौरव समितीचे अध्यक्ष प्रदीप आप्पा कदम यांच्या पुढाकारातून शाल, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयात विशेष सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले.यावेळी बोलताना प्रदीप आप्पा कदम यांनी दोन्ही युवकांचे अभिनंदन करताना सांगितले की, "ग्रामीण भागातील युवकांनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर राष्ट्रीय स्तरावर यश संपादन करणे ही अभिमानास्पद बाब आहे. श्रेयश साळुंखे यांनी सीएसारखी कठीण परीक्षा उत्तीर्ण होऊन शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळविले आहे, तर प्रथमेश यादव यांनी देशसेवेचे व्रत स्वीकारत भारतीय सैन्य व नौदलात मानाचे स्थान प्राप्त केले आहे. त्यांच्या यशामुळे परिसरातील इतर युवकांनाही प्रेरणा मिळेल."
श्रेयश साळुंखे यांनी आपल्या यशामागील आई-वडील, शिक्षक व मार्गदर्शकांचे योगदान अधोरेखित करत तरुणांनी ध्येय निश्चित करून सातत्याने प्रयत्न केल्यास कोणतेही यश अशक्य नसल्याचे सांगितले. तसेच प्रथमेश यादव यांनी देशसेवा करण्याची संधी मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त करत युवकांनी शिस्त, मेहनत आणि देशभक्तीची भावना जोपासावी, असे आवाहन केले.
या सत्कार समारंभास प्रताप पाटील, बाळकृष्ण पवार, तुकाराम धायगुडे, अमीरभैया पठाण, राहुल पाटील, अनिल पाटील, रणजीत शिंदे, दौलत पाटील, विकी तातुगडे, अंकुश राजमाने, योग पाटील, संजय शिंदे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात उपस्थितांनी यशस्वी युवकांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. संपूर्ण परिसरात या यशाबद्दल आनंदाचे वातावरण असून दोन्ही युवकांनी आपल्या कर्तृत्वाने पलूस तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या