प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
मुंबई:शेतकरी कर्जमाफीच्या प्रश्नावर मंगळवारी विधानसभा सभागृहात मोठा गदारोळ झाला. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसंदर्भात विरोधी पक्षातील आमदार आक्रमकपणे आपली भूमिका मांडत असताना कृषिमंत्री दत्तात्रय भरणे सभागृहात उपस्थित नसल्याची बाब निदर्शनास आली.लाखो शेतकऱ्यांशी संबंधित महत्त्वाच्या विषयावरील चर्चेदरम्यान संबंधित मंत्रीच अनुपस्थित असल्याचे लक्षात येताच आ.कैलास पाटील, आ.रोहित पाटील आणि आ.ज्योती गायकवाड यांनी आक्रमक पवित्रा घेत सरकारला धारेवर धरले.
या तिन्ही आमदारांनी कृषिमंत्र्यांच्या अनुपस्थितीबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत थेट विधिमंडळ सभागृहाच्या ‘डी’ मध्ये जाऊन निषेध नोंदविला.त्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे काही काळ सभागृहात मोठा गदारोळ निर्माण झाला.आमदारांचा वाढता रोष आणि सभागृहातील तणावपूर्ण वातावरण लक्षात आल्यानंतर कृषिमंत्री दत्तात्रय भरणे व राज्याचे कृषी सचिव तातडीने सभागृहात दाखल झाले.कर्जमाफीतील त्रुटी, निकषांतील विसंगती,अपुरी आर्थिक तरतूद आणि शेतकऱ्यांच्या वाढत्या अडचणी याकडे तिन्ही आमदारांनी सभागृहाचे लक्ष वेधले. राज्यातील सर्वात तरुण आणि विधानसभा सभागृहातील सर्वात कमी वयाचे सदस्य म्हणून ओळख असलेले आ. रोहित पाटील यांनी अभ्यासपूर्ण व आक्रमक भूमिका घेत सरकारला थेट सवाल केले, तर आ. कैलास पाटील आणि आ. ज्योती गायकवाड यांनीही शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर ठाम भूमिका मांडत सरकारकडे उत्तरांची मागणी केली.या तीन तरुण आमदारांनी सभागृह अक्षरशः डोक्यावर घेतल्याचे लक्षात येताच विरोधी पक्षातील अनेक आमदार त्यांच्या समर्थनार्थ पुढे सरसावले.त्याचवेळी सत्ताधारी पक्षातील काही आमदारही सभागृहाच्या मध्यभागी जमा झाल्याने वातावरण अधिकच तापले आणि संपूर्ण सभागृहाचे लक्ष या घडामोडीकडे वेधले गेले.शेतकऱ्यांच्या हितासाठी तिन्ही आमदारांनी घेतलेल्या आक्रमक आणि एकजुटीच्या भूमिकेमुळे शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा अधिवेशनात केंद्रस्थानी आला असून सरकार आणि विरोधकांतील संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या