प्रतिष्ठा न्यूज / योगेश रोकडे
सांगली : मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राने राज्यासाठी पुढील पाच दिवसांचा हवामान अंदाज जाहीर केला असून, सांगली जिल्ह्यास 24 ते 26 जूनदरम्यान यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या कालावधीत मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार कोकण, पश्चिम महाराष्ट्र तसेच विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कायम राहणार आहे. रायगड, पुणे घाटमाथा आणि सिंधुदुर्ग या भागांसाठी काही दिवस ऑरेंज अलर्ट, तर रत्नागिरी जिल्ह्यास 23 जून रोजी रेड अलर्ट देण्यात आला होता.
सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे, नाशिक, मुंबई, ठाणे आदी जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. शेतकऱ्यांनी शेतीची कामे करताना हवामानाचा अंदाज लक्षात घ्यावा तसेच वादळी वाऱ्याच्या वेळी झाडाखाली अथवा उघड्या जागेत थांबणे टाळावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, पुढील काही दिवस राज्यातील बहुतांश भागांत पावसाची सक्रियता कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या