प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकपदा बाबत सुरू असलेल्या वादाला अखेर मोठे वळण मिळाले असून, विभागीय सहनिबंधक,सहकारी संस्था,कोल्हापूर यांनी जिल्हा उपनिबंधक,सांगली यांनी दिलेला अपात्रतेचा आदेश रद्द केला आहे.त्यामुळे संचालक रविंद्र वसंत पाटील यांना मोठा दिलासा मिळाला आहे.प्राप्त आदेशानुसार,रविंद्र पाटील हे कृषी पतसंस्था व बहुउद्देशीय पीक कर्जवाटप संस्था शेतकरी मतदारसंघातून तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीवर संचालक म्हणून निवडून आले होते.त्यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीत,अराबा अॅग्रो फार्म्स प्रोड्युसर कंपनी लिमिटेड,तासगाव या कंपनीकडे कृषी उत्पन्न बाजार समितीचा व्यापारी परवाना असल्याने रविंद्र पाटील यांना संचालकपदी राहण्यास अपात्र ठरवावे,अशी मागणी संचालक महादेव पाटिल यांच्या कडून करण्यात आली होती.या तक्रारीवर सुनावणी घेत जिल्हा उपनिबंधक,सहकारी संस्था,सांगली यांनी २३ जानेवारी २०२५ रोजी रविंद्र पाटील यांना अपात्र घोषित केले होते.या निर्णयाविरोधात रविंद्र पाटील यांनी विभागीय सहनिबंधक, कोल्हापूर यांच्याकडे अपील दाखल केले होते.
*कंपनीचा परवाना म्हणजे संचालकाचा वैयक्तिक परवाना नाही*
अपीलच्या सुनावणीत महत्त्वाचा मुद्दा समोर आला.अराबा अॅग्रो फार्म्स प्रोड्युसर कंपनी लिमिटेड ही कंपनी कायदा २०१३ अंतर्गत नोंदणीकृत स्वतंत्र संस्था असून, कंपनीचा व्यापारी परवाना हा कंपनीच्या नावावर आहे,व्यक्तीच्या नावावर नाही.त्यामुळे कंपनीचा संचालक असलेल्या व्यक्तीकडे वैयक्तिक व्यापारी परवाना असल्याचे गृहित धरता येत नाही,असे निरीक्षण विभागीय सहनिबंधकांनी नोंदविले.तसेच,संबंधित कंपनीने परवाना घेतल्यानंतर कोणत्याही प्रकारचा शेतमाल खरेदी-विक्री व्यवहार केल्याचे पुरावे सादर झाले नसल्याचेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
*उच्च न्यायालयाच्या निर्णयांचाही आधार*
या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासह सर्वोच्च न्यायालयाच्या काही निर्णयांचा आधार घेत विभागीय सहनिबंधकांनी महत्त्वपूर्ण निरीक्षणे नोंदविली.कंपनीचे स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व असल्याने कंपनीचा परवाना आणि संचालकाचा वैयक्तिक दर्जा यांची सरमिसळ करता येणार नाही,असे स्पष्ट करण्यात आले.
*अपात्रतेचा आदेश रद्द*
विभागीय सहनिबंधक,कोल्हापूर यांनी दिलेल्या अंतिम आदेशानुसार
रविंद्र पाटील यांचे अपील मंजूर करण्यात आले.
जिल्हा उपनिबंधक,सहकारी संस्था, सांगली यांनी दिलेला अपात्रतेचा आदेश रद्द करण्यात आला.
*खर्चाबाबत कोणताही स्वतंत्र आदेश देण्यात आलेला नाही.*
या निर्णयामुळे तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली असून,संचालक रविंद्र पाटील यांना मोठा कायदेशीर आणि राजकीय दिलासा मिळाल्याची चर्चा सुरू आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या