प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : तालुक्यात सध्या बेसुमार वृक्षतोड सुरू असून, त्याकडे वन विभागाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष होत असल्याचा गंभीर आरोप नागरिकांतून होत आहे.अनेक गावांमध्ये दररोज शेकडो झाडांची कत्तल होत असून,पर्यावरणाचा समतोल धोक्यात येत आहे. एकीकडे शासनाकडून "झाडे लावा, झाडे जगवा"चा संदेश देत कोट्यवधी रुपयांचा खर्च करून वृक्ष लागवड अभियान राबविले जात आहे,तर दुसरीकडे त्याच वृक्षांची मोठ्या प्रमाणावर कत्तल होत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.तालुक्यातील अनेक गावात खासगी शेतजमिनींच्या बांधावरील तसेच इतर ठिकाणांवरील वृक्षांची मोठ्या प्रमाणावर तोड सुरू आहे. अनेक ठिकाणी वन विभागाची कोणतीही परवानगी न घेता चोरीछुप्या पद्धतीने वृक्षतोड केली जात असल्याचे चित्र आहे.
नियमांनुसार स्वमालकीच्या जागेवरील वृक्षतोडीसाठीही वन विभागाची परवानगी आवश्यक असते.अर्ज प्राप्त झाल्यानंतर वनपाल व वनक्षेत्रपाल घटनास्थळी जाऊन झाडांचे मूल्यमापन करतात आणि त्यानंतरच परवानगी दिली जाते. मात्र, अनेक ठिकाणी या नियमांची सर्रास पायमल्ली होत असून संबंधित यंत्रणा मात्र मौन बाळगून असल्याचे दिसून येत आहे.शासनाने पर्यावरण संवर्धनासाठी वृक्ष लागवड योजनेसह विविध उपक्रम राबविले.गावागावांत समित्याही स्थापन करण्यात आल्या. मात्र,या समित्या केवळ कागदोपत्रीच असल्याचा आरोप होत आहे. वृक्षसंवर्धनासाठी खर्च होणाऱ्या लाखो रुपयांच्या निधीचा उद्देशच त्यामुळे धुळीस मिळत असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.
वन विभागाच्या निष्क्रियतेमुळे वृक्षतोडीचा काळाबाजार वाढला असून, या व्यवसायाशी संबंधित दलाल मंडळींची चांगलीच चांदी होत असल्याचे बोलले जात आहे. हिरवाई नष्ट होत असताना संबंधित विभागाकडून ठोस कारवाई होत नसल्याने पर्यावरणप्रेमी आणि ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.तालुक्यातील वाढती अवैध वृक्षतोड थांबविण्यासाठी वन विभागाने तातडीने विशेष मोहीम राबवून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. अन्यथा भविष्यात पर्यावरणीय संकट आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या