प्रतिष्ठा न्यूज
सांगली, प्रतिनिधी : निसर्ग, पर्यावरण संवर्धन, संस्कृती आणि सामाजिक बांधिलकीची जपणूक करणाऱ्या निसर्गरंग फाऊंडेशन, सांगली यांच्या वतीने ‘निसर्गरंग सायकल वारी २०२६’ चे आयोजन करण्यात आले आहे. यंदा या प्रेरणादायी उपक्रमाचे दहावे वर्ष साजरे होत असून, मंगळवार २१ जुलै २०२६ ते शनिवार २५ जुलै २०२६ (आषाढी एकादशी) या कालावधीत ही सायकल वारी पार पडणार आहे.
‘निसर्गराया भेटूया | चला, विठ्ठल पेरूया ||’ या संकल्पनेवर आधारित ही सायकल वारी सांगलीच्या सांस्कृतिक भूमीतून विठ्ठल नगरी पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. या उपक्रमातून पर्यावरण संवर्धन, निसर्गप्रेम, सामाजिक जागरूकता आणि विठ्ठलभक्तीचा संदेश जनमानसात पोहोचविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
गेल्या नऊ वर्षांपासून सातत्याने राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. यंदाच्या विशेष वारीत कलाकार, साहित्यिक, तंत्रज्ञ, छायाचित्रकार, सायकलप्रेमी, निसर्गप्रेमी तसेच निसर्गसोबती यांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
निसर्गाशी नाते अधिक दृढ करण्यासाठी, पर्यावरण संवर्धनाचा संकल्प समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी आणि विठ्ठलभक्तीचा संदेश रुजवण्यासाठी या आगळ्यावेगळ्या प्रवासात सहभागी व्हावे, असे आवाहन निसर्गरंग फाऊंडेशनचे संस्थापक कुलदीप देवकुळे यांनी केले आहे.
नावनोंदणी व अधिक माहितीसाठी इच्छुकांनी ७८२१०७५२२१ या क्रमांकावर संपर्क साधावा.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या