प्रतिष्ठा न्युज प्रतिनिधी/आशिष कोठावळे
तळसंदे : श्री बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ, अंबप संचलित तळसंदे हायस्कूल, तळसंदे येथे माध्यमिक व प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ‘पब्लिक हेल्थ क्लब’ या नाविन्यपूर्ण उपक्रमाचा शुभारंभ उत्साहात करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये आरोग्यविषयक जाणीव, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि संशोधनवृत्ती विकसित करण्याच्या उद्देशाने हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे साडेतीन हजार शाळांपैकी निवड करण्यात आलेल्या ५२ शाळांमध्ये हा पायलट प्रोजेक्ट राबविण्यात येत असून, तळसंदे हायस्कूलचीही त्यासाठी निवड झाली आहे. अमेरिकेतील शिक्षणतज्ज्ञ व सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञ डॉ. आशिष जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
या उपक्रमांतर्गत इयत्ता आठवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांपैकी प्रत्येकी ३० विद्यार्थ्यांचा सहभाग असणार आहे. शाळेचे मुख्याध्यापक प्रकल्प प्रमुख म्हणून कार्य पाहणार असून, एक शिक्षक नोडल अधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडणार आहेत.
‘पब्लिक हेल्थ क्लब’चा मुख्य उद्देश समाजामध्ये आरोग्यविषयक जाणीव वाढविणे, प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा मजबूत करणे आणि निरोगी जीवनशैलीचा प्रसार करणे हा आहे. विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा, निरीक्षण, प्रश्न विचारण्याची वृत्ती, कारण-परिणाम समजून घेण्याची क्षमता आणि वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्यावर विशेष भर दिला जाणार आहे. आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विषयांचा अभ्यास करत विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष संशोधन प्रक्रियेत सहभागी करून घेतले जाणार आहे.
या उपक्रमातून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष जीवनातील समस्यांकडे वैज्ञानिक दृष्टीने पाहणे, माहिती संकलन, विश्लेषण आणि निष्कर्ष काढण्याची क्षमता विकसित करता येणार आहे. तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० (एनईपी-२०२०) नुसार अनुभवाधारित शिक्षणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यास या प्रकल्पाची मदत होणार आहे.
कार्यक्रमास डॉ. आशिष जोशी, माध्यमिक शिक्षण विस्तार अधिकारी डी. ए. पाटील, प्राथमिक विभागाच्या जिल्हा समन्वयक आम्रपाली देवेकर, मानसी मॅडम, अलका देवरे, डॉ. उपमा शर्मा, डॉ. रश्मी निराळे, नोडल अधिकारी अविनाश कर्णिक, जयसिंग सूर्यवंशी, जयश्री मुळीक, पुष्पा जगताप, सपना पाटील आणि सर्जेराव माने आदी मान्यवर उपस्थित होते.
संस्थेचे अध्यक्ष विजयसिंह माने आणि संचालिका मनीषा माने यांनी या नाविन्यपूर्ण उपक्रमाला शुभेच्छा देत विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी आणि उपयुक्त ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या