प्रतिष्ठा न्यूज | कडेगाव प्रतिनिधी
सांगली जिल्ह्यातील कडेगाव येथे दीडशे वर्षांहून अधिक परंपरा लाभलेल्या मोहरममधील गगनचुंबी ताबूतांच्या गळाभेटींचा भव्य सोहळा शुक्रवारी मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने पार पडला. हिंदू-मुस्लिम ऐक्य, सामाजिक सलोखा आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणाऱ्या या सोहळ्यासाठी राज्यासह कर्नाटकातून हजारो भाविकांनी उपस्थिती लावली.
सकाळपासूनच कडेपूर, शिवाजीनगर, विहापूर, सोहोली, निमसोड आदी गावांतील मानकरी ताबूतांसह कडेगावात दाखल झाले. विधिवत पूजनानंतर सकाळी ११ वाजता मानाचा सातभाई ताबूत उचलण्यात आला आणि गळाभेटींच्या सोहळ्याला प्रारंभ झाला. विजबोर्ड परिसर, पाटील चौक आणि त्यानंतर मोहरम मैदानावर विविध मानाचे ताबूत पारंपरिक मानाप्रमाणे एकत्र आणण्यात आले.
"या हुसेन... हक हुसेन...", "इमाम हुसेन जिंदाबाद..." अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. सातभाई, पाटील, बागवान, अत्तार, हकीम आणि देशपांडे यांच्या गगनचुंबी ताबूतांच्या गळाभेटींचा मुख्य सोहळा दुपारी पार पडला. स्थानिक नागरिक या पारंपरिक भेटीला "राम-भरताची भेट" म्हणून संबोधतात. गळाभेटीच्या वेळी उपस्थितांनी फेटे व टोप्या उंचावत जल्लोष केला.
मोहरम मैदानावर मेलवाल्यांनी "महान भारत देश अमुचा घुमवू जयजयकार" तसेच "हिंदू-मुस्लिम साथ रहेंगे..." यांसारखी राष्ट्रीय एकात्मतेची गीते सादर करून बंधुभावाचा संदेश दिला. त्यानंतर मसूद माता ताबूत पंजे आणि बारा इमाम पंजे पारंपरिक मानाप्रमाणे आणण्यात आले आणि मुख्य गळाभेटींचा सोहळा संपन्न झाला.
सोहळ्यासाठी माजी मंत्री बाळासाहेब पाटील, माजी आमदार मोहनराव कदम, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, आमदार अरुण लाड, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राजाराम गरुड, डॉ. जितेश कदम, हर्षवर्धन कदम, नगराध्यक्ष धनंजय देशमुख, मालन मोहिते, प्रांताधिकारी रणजित भोसले, तहसीलदार अजित शेलार, मुख्याधिकारी पवन म्हेत्रे, राजेंद्र देशपांडे, प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष फुलुके यांच्यासह विविध मान्यवर, सर्व ताबूत मालक, मानकरी आणि हजारो भाविक उपस्थित होते. कार्यक्रमासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
पहाटेपासूनच सांगली, सातारा, कराड, विटा, कोल्हापूर, पुणे, मुंबई तसेच कर्नाटकातून भाविक मोठ्या संख्येने कडेगावात दाखल झाले. गावातील प्रमुख रस्ते आणि चौक भाविकांनी गजबजून गेले होते.
कडेगावचा मोहरम हा केवळ धार्मिक उत्सव नसून हिंदू-मुस्लिम ऐक्य, सामाजिक सलोखा आणि राष्ट्रीय एकात्मतेचे जिवंत प्रतीक म्हणून आजही महाराष्ट्रात विशेष ओळख जपत असल्याचे यानिमित्त पुन्हा अधोरेखित झाले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या