पलूस प्रतिनिधी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या कार्यकाळाला बारा वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पलूस येथे रविवार दि. २८ जून रोजी सायंकाळी ५ वाजता विशेष कार्यक्रम आयोजित केला आहे.
शिव शंभो मल्टीपर्पज हॉल कराड तासगाव रोड पलूस येथे हा कार्यक्रम होणार आहे. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करून पुरस्कार प्राप्त केलेल्या तसेच अलीकडेच सन्मान जाहीर झालेल्या मान्यवरांचा यावेळी गौरव करण्यात येणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रदीपआप्पा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास माजी ग्रामविकास मंत्री व ज्येष्ठ नेते अण्णासाहेब डांगे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून त्यांच्या हस्ते सत्कारमूर्तींचा सन्मान करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमात पुढारी आयकॉन पुरस्कार मिळाल्याबद्दल माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल उद्योजक सर्जेराव नलवडे, महाराष्ट्र शासनाचा जिजामाता कृषिभूषण पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल सौ. पुष्पावती मिठारी, तसेच महाराष्ट्र शासनाचा सेंद्रिय कृषीभूषण पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल प्रगतशील शेतकरी सुनील भोसले यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे.
यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस डॉ. प्रताप पाटील, सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, क्रांती सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शरद लाड जिल्हा परिषदेचे बांधकाम व अर्थ सभापती पृथ्वीराज पाटील आणि शिवसेना सांगली जिल्हाप्रमुख आनंदराव पवार, संजय विभुते, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, वाळवा तालुकाध्यक्ष केदार पाटील उपस्थित राहणार आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस वक्ता सेलचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डॉ विशाल माने, भारतीय जनता पार्टी सांगली जिल्हा कोषाध्यक्ष डॉ भालचंद्र साठे हे प्रमुख वक्ते आहेत. कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बारा वर्षांच्या कार्यकाळात देशभरात झालेली विकासकामे, राबविण्यात आलेल्या विविध लोककल्याणकारी योजना तसेच केंद्र शासनाच्या विविध उपक्रमांची माहिती मान्यवरांच्या व्याख्यानातून दिली जाणार आहे.
या कार्यक्रमास परिसरातील नागरिक, कार्यकर्ते, शेतकरी आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या