सांगली ता. २६ : गुरु-शिष्य नात्यातील ऋणानुबंध, कृतज्ञता आणि जिव्हाळा अधोरेखित करणारा एक आगळावेगळा स्नेहमेळावा विश्रामबाग (सांगली) येथील हेमराज गार्डन येथे नुकताच संपन्न झाला.अमेरिकास्थित शास्त्रज्ञ आणि येथील सिटी हायस्कूलचे माजी विद्यार्थी डॉ.सौरभ जोशी यांनी आपल्या शिक्षकांशी संवाद साधण्यासाठी आणि त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
बेंगळुरस्थित अभियंता आणि चित्रकार सुमंत जोशी यांच्या कल्पकतेतून साकारलेल्या या मेळाव्यात निवृत्त मुख्याध्यापक, प्राचार्य, प्राध्यापक,आजी माजी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.सांगली शिक्षण संस्थेचे माजी कार्यवाह आणि माजी मुख्याध्यापक श्री.यशवंत महादेव तथा य.म.जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि संस्थेचे माजी अध्यक्ष श्री.अशोकराव घारपुरे यांच्या अध्यक्षतेखाली हा मेळावा घेण्यात आला. सौरभ जोशी यांनी सिटी हायस्कूलमध्ये आपल्याला शिकविणाऱ्या शिक्षकांना भेटण्याची इच्छा वडिलांपुढे व्यक्त केली. त्यानुसार त्यांची भेट घेऊन कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी २२जून २०२६ रोजी आयोजित केलेल्या मेळाव्यात शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देण्यात आला. शिक्षकांवरील प्रेम, आदर आणि जिव्हाळ्याच्या भावनेतून सौरभ जोशी यांच्या हस्ते संस्थेचे कार्यवाह शिरीष गोसावी, निवृत्त मुख्याध्यापक ग.बा.सपकाळ, कलाशिक्षक ग.मा.माळी, नवनियुक्त प्राचार्य डॉ.सुशील कुमार, मुख्याध्यापक केदारी रसाळ, निवृत्त मुख्याध्यापक प्रकाश वायदंडे यांचा बुके व पेढे देऊन सत्कार करण्यात आला. शिक्षकांच्या वतीने सौरभ जोशी यांचाही सत्कार करण्यात आला. प्रारंभी श्री. य. म. जोशी यांनी स्नेह मेळाव्याचा उद्देश स्पष्ट केला. त्यानंतर केदारी रसाळ, जी. जी. कुलकर्णी, साहित्यिक विजय जंगम, प्रकाश वायदंडे, महेश पाठक यांनी मनोगत व्यक्त केले. आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त शास्त्रज्ञ सौरभ जोशी यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, सातवी शिष्यवृत्ती परीक्षेच्या गुणवत्ता यादीत सिटी हायस्कूलच्या ज्या २१ विद्यार्थ्यांना सुयश मिळाले. त्यापैकी मी एक होतो. त्यावेळीच आपण शाळा, समाज आणि देशासाठी काहीतरी वेगळे करण्याची जिद्द मनात बाळगली आणि उच्च शिक्षण घेताना तापमान वाढल्यानंतर त्याचा प्रतिक्रिया (CSR Reaction) दरावर त्याचा काय परिणाम होतो याविषयीचे संशोधन केले. ज्याविषयी गेल्या साठ-सत्तर वर्षांपासून कुणीही संशोधन केले नव्हते.
आपल्या अध्यक्षीय भाषणात श्री. घारपुरे म्हणाले, सांगलीसारख्या भागातून अमेरिकेत जाऊन सौरभने संशोधनाचे जे उल्लेखनीय कार्य केले आहे ते खूपच स्तुत्य आहे. आपण आयोजित केलेला हा स्नेहमेळावा माझ्यासाठी खूप ऊर्जा देणारा आहे. यातून माझे आयुर्मान आणखी चार वर्षांनी वाढेल.
या निमित्ताने भ.र.कुलकर्णी, मुकुंद जोग, जगदीश कोळी, संतोष कोळी, प्रा.डॉ.युवराज पवार, विघ्नराज ताम्हणकर, मोहन काळे, धोंडीराम कांबळे, बबन कोकरे, प्रकाश कानडे, सौ.अंजली गोसावी, सौ. ज्योती आपटे, जयंत आपटे, धनंजय कुलकर्णी, प्रशांत वाठारकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या