पलूस प्रतिनिधी : प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गाविरोधातील आंदोलन आता निर्णायक टप्प्यात पोहोचले असून, शक्तिपीठ बाधित शेतकऱ्यांच्या वतीने विटा, कडेगाव आणि पलूस येथे सलग तीन दिवस भव्य धडक मोर्चांचे आयोजन करण्यात आले आहे. शक्तिपीठ विरोधी संघर्ष समितीचे निमंत्रक ॲड. दीपक लाड यांनी या आंदोलनाची माहिती दिली.
प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गामुळे हजारो एकर सुपीक शेती, बागायती क्षेत्र, घरे, विहिरी तसेच शेतकऱ्यांचे पारंपरिक उपजीविकेचे साधन धोक्यात येणार असल्याने बाधित शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. "जमीन आमची, हक्क आमचा" या भूमिकेतून शेतकरी संघटित होत असून, महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी मोठ्या प्रमाणावर जनआंदोलन उभे राहत आहे.
संघर्ष समितीच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या कार्यक्रमानुसार सोमवार, दि. २२ जून २०२६ रोजी विटा, मंगळवार, दि. २३ जून २०२६ रोजी कडेगाव आणि बुधवार, दि. २४ जून २०२६ रोजी पलूस येथे सकाळी १० वाजता भव्य मोर्चे काढण्यात येणार आहेत.
विटा येथे मोर्चा क्रांतिसिंह नाना पाटील चौकातून निघून तहसील कार्यालयावर धडकणार आहे. कडेगाव येथे मुख्य चौकातून तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात येणार असून, पलूस येथे जुने बसस्थानक ते तहसील कार्यालय असा मोर्चाचा मार्ग निश्चित करण्यात आला आहे.
या मोर्चांमध्ये हजारो शेतकरी, महिला, युवक, शेतकरी संघटनांचे कार्यकर्ते तसेच विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी सहभागी होणार असल्याचे संघर्ष समितीने स्पष्ट केले आहे. गावागावांत बैठका, जनजागृती मोहिमा आणि शेतकरी संपर्क अभियान राबवून आंदोलनाची व्यापक तयारी करण्यात आली आहे.
"शक्तिपीठ हटवा, शेतकरी वाचवा", "शेतकऱ्यांवर अन्याय चालणार नाही" आणि "शक्तिपीठ आमच्या हक्काचा नाही, कोणाच्या बापाचा नाही" अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडण्याचा निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला आहे.
शासनाने शेतकऱ्यांच्या भावना आणि मागण्यांचा आदर करून प्रस्तावित शक्तिपीठ महामार्ग तात्काळ रद्द करावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा संघर्ष समितीचे निमंत्रक ॲड. दीपक लाड यांनी दिला आहे.
या सलग तीन मोर्चांमुळे सांगली जिल्ह्यातील शक्तिपीठ महामार्गविरोधी आंदोलनाला नवे बळ मिळणार असून, हजारो बाधित शेतकरी आपल्या जमिनी आणि हक्कांच्या संरक्षणासाठी एकजुटीने लढा उभारण्याच्या तयारीत असल्याचे चित्र दिसून येत आहे. "एकजूट शेतकऱ्यांची... लढा हक्कांसाठी!" हा संदेश देत आंदोलनाची जोरदार तयारी सुरू आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या