सांगली, प्रतिनिधी : सांगली शहरातील तरुणांमध्ये नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांच्या बेकायदेशीर विक्रीविरोधात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (एलसीबी) मोठी कारवाई करत मेफेन्टरमाइन सल्फेट इंजेक्शनचा साठा जप्त केला आहे. या कारवाईत सुमारे ₹५६,८०० किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एका संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार व त्यांच्या पथकाला गुप्त माहिती मिळाली होती की, सांगलीतील एक इसम नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या मेफेन्टरमाइन इंजेक्शनची विक्री करीत आहे. मिळालेल्या माहितीनुसार पथकाने फुले मंगल कार्यालय परिसरात सापळा रचून संशयितावर नजर ठेवली.
तपासादरम्यान राहुल महादेव अडगळे (वय ३२, रा. मंदिरामागे, समडोळी रोड, सांगलीवाडी, सांगली) याच्याकडे चौकशी करण्यात आली. त्याच्या ताब्यातून मेफेन्टरमाइन सल्फेट इंजेक्शनचे ८० व्हायल्स, त्यांची रिकामी पाकिटे तसेच एक मोबाईल फोन असा एकूण ₹५६,८०० किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित इंजेक्शनचा वैद्यकीय परवानगीशिवाय साठा व विक्री करण्यात येत होती. हे इंजेक्शन काही तरुणांकडून नशेसाठी व उत्तेजक पदार्थ म्हणून वापरले जात असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. आरोपीकडे या औषधाच्या खरेदी-विक्रीसाठी आवश्यक परवाना अथवा कागदपत्रे आढळून आली नाहीत.
याप्रकरणी सांगली शहर पोलीस ठाण्यात औषधे व सौंदर्यप्रसाधने अधिनियम १९४० च्या कलम १८(क) सह संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जप्त करण्यात आलेल्या इंजेक्शनच्या पुरवठा साखळीचा तसेच या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलीस करीत आहेत.
ही कारवाई पोलीस निरीक्षक संजीव अड्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार, पोलीस अंमलदार रजनीत जाधव, अनिल माने, संदीप पाटील, अभिजित माळकर, संकेत कानडे, विनायक नरसते, शेखरकुमार रमसाने, हर्षद होळकर, सुमित सूर्यवंशी आदींच्या पथकाने केली.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या