मान्सूनपूर्व पावसाचा तडाखा; भारती शुगर्सला कोट्यवधींचा फटका
By -
जून ०२, २०२६
0
प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:खानापूर तालुक्यात रविवारी (दि. ३१ मे) सायंकाळी झालेल्या वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाने नागेवाडी येथील भारती शुगर्स अँड फ्युएल्स प्रा. लि. या साखर कारखान्याला जबरदस्त तडाखा दिला.अवघ्या काही मिनिटांच्या वादळाने कारखान्याच्या इमारती, गोदामे आणि विद्युत यंत्रणांचे मोठे नुकसान झाले असून, प्रथमदर्शनी सुमारे सव्वा कोटी रुपयांच्या नुकसानीचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी आर. डी. पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, वादळी वाऱ्याच्या प्रचंड वेगामुळे कारखान्याच्या नवीन मुख्य इमारतीतील मिल हाऊस, बॉयलिंग हाऊस, पॉवर हाऊस तसेच ईटीपी शेडवरील रंगीत पत्रे उडून गेली. जुन्या इमारतीवरील सिमेंट पत्र्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. वाऱ्यामुळे उडालेली पत्रे दूरवर जाऊन पडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.याशिवाय,विविध विभागांतील इलेक्ट्रिक पॅनेलमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने अनेक पॅनेल निकामी झाले आहेत.त्यामुळे कारखान्याच्या यंत्रणा आणि उत्पादन प्रक्रियेवरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.वादळाचा सर्वाधिक फटका कारखान्याच्या साखर गोदामाला बसला.गोदामावरील पत्रे उडून गेल्याने आत साठवून ठेवलेल्या साखरेवर पावसाचे पाणी पडले असून,मोठ्या प्रमाणावर साखर भिजल्याची माहिती समोर आली आहे. गोदामातील संपूर्ण साठ्याची तपासणी अद्याप सुरू असून, नुकसानाची रक्कम आणखी वाढण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.वादळी पावसाने कारखान्यातील कामगार आणि कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांनाही फटका बसला.अनेक घरांवरील पत्रे उडून गेल्याने कर्मचाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.गेल्या चार दिवसांपासून खानापूर तालुक्यात वादळी वारे आणि मान्सूनपूर्व पावसाचे वातावरण निर्माण झाले होते. हवामान विभागानेही सांगली जिल्ह्यासाठी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा इशारा दिला होता. रविवारी सकाळपासूनच वातावरण ढगाळ होते. सायंकाळी अचानक वाऱ्याचा वेग वाढला आणि काही क्षणांतच जोरदार वादळाने परिसराला झोडपून काढले.
या वादळामुळे नागेवाडी आणि परिसरातील अनेक घरांचे, गोठ्यांचे तसेच शेतीपूरक संरचनांचे नुकसान झाले आहे.सुदैवाने या संपूर्ण घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.दरम्यान,नागेवाडी येथील ग्राम महसूल अधिकाऱ्यांनी कारखान्याच्या नुकसानीचा पंचनामा केला असून, महसूल विभागाकडून नुकसानग्रस्त भागांचे सर्वेक्षण आणि पंचनाम्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.नैसर्गिक आपत्तीच्या या तडाख्यात नागेवाडी परिसरातील अनेकांचे नुकसान झाले असले तरी, सर्वाधिक आर्थिक फटका भारती शुगर्सला बसल्याचे स्पष्ट झाले असून, कोट्यवधी रुपयांच्या नुकसानीमुळे उद्योग क्षेत्रातही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या