प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव: येथील संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे महिला शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्यपदी शिक्षणतज्ज्ञ व अभ्यासू प्राध्यापक प्रो.डॉ.रत्नाकर म्हस्के यांची नियुक्ती करण्यात आली आहे.त्यांच्या निवडीमुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक, प्रशासकीय आणि संशोधनात्मक कार्याला नवी ऊर्जा मिळणार असल्याची भावना शिक्षण क्षेत्रातून व्यक्त होत आहे.प्रो. डॉ. रत्नाकर म्हस्के यांनी शिक्षणशास्त्र क्षेत्रात दीर्घकाळ उल्लेखनीय योगदान दिले असून अध्यापन, संशोधन, विद्यार्थी मार्गदर्शन, शैक्षणिक नियोजन तसेच विविध प्रशासकीय जबाबदाऱ्यांमध्ये त्यांनी आपला ठसा उमटविला आहे. विद्यार्थीकेंद्रित शिक्षण, गुणवत्तावाढ, नवोपक्रम आणि मूल्याधिष्ठित शिक्षण यावर त्यांचा विशेष भर राहिला आहे.राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, संशोधनाभिमुख शिक्षण, शिक्षक प्रशिक्षण, व्यक्तिमत्त्व विकास आणि गुणवत्तापूर्ण अध्यापन पद्धती यासाठी त्यांनी सातत्याने कार्य केले आहे.विद्यार्थिनींना स्पर्धात्मक युगात सक्षम बनविण्यासाठी कौशल्याधारित शिक्षण आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यावर त्यांनी विशेष लक्ष केंद्रित केले आहे.नियुक्तीनंतर बोलताना प्रो. डॉ. म्हस्के यांनी महाविद्यालयाच्या समृद्ध शैक्षणिक परंपरेला अधिक बळकट करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले.विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासासाठी, संशोधन संस्कृतीच्या वृद्धीसाठी आणि राष्ट्रीय मूल्यांवर आधारित गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी दिली.यावेळी प्राचार्य डॉ.बी.एम.पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला व भावी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.तसेच डॉ.लक्ष्मी भंडारे, डॉ. देवदत्त खजूरकर, डॉ. अर्चना चिखलीकर, प्रा. अंकुश पंडित, प्रा. प्रमोद शेंडगे, प्रा. शेटे, प्रा. पोपट यमगर, संजय कुंभार आणि हणमंत वाघमारे यांनीही त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
प्रो. डॉ. रत्नाकर म्हस्के यांच्या अनुभवसंपन्न नेतृत्वामुळे संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे महिला शिक्षणशास्त्र महाविद्यालयाची शैक्षणिक गुणवत्ता, संशोधन कार्य आणि सामाजिक बांधिलकी अधिक दृढ होईल. त्यांच्या नियुक्तीमुळे महाविद्यालयाच्या उज्ज्वल वाटचालीत एक नवे आणि महत्त्वपूर्ण पर्व सुरू झाल्याची भावना व्यक्त होत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या